मुजफ्फरनगर: लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या सहनशिलतेचा बांध फुटला आहे. हजारो स्थलांतरित मजूर गावाकडे पायपीट करत निघाले आहेत. त्यातच मजूरांच्या अपघाती मृत्यूंचे प्रमाणही वाढले आहे. उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशमध्ये झालेल्या दोन अपघातांमध्ये घरी निघालेल्या 14 मजुरांचा मृत्यू झाला आहे. उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये एका बसने पायी जाणाऱ्या मजुरांना चिरडले आहे. या दुर्देवी घटनेत 6 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर 4 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. माहितीनुसार हे मजूर पंजाबहून पायी बिहारच्या गोपालगंज येथे चालले होते. ही घटना थाना नगर कोतवाली परिसरात मुजफ्फरनगर देवबंद सहारनपुर राजमार्ग टोलनाक्याजवळ घडली. माहितीनुसार बसचा ड्रायवर दारुच्या नशेत होता. घटनेनंतर बस ड्रायवरला अटक केली आहे. तर दुसऱ्या एका घटनेत बुधवारी रात्री महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशकडे निघालेल्या मजुरांच्या ट्रकला झालेल्या भीषण अपघातात झाल्याने त्यात 8 जणांना आपला जीव गमवावा लागला.

लॉकडाऊननं सर्वात मोठा फटका मजूर आणि कामगारांना बसला आहे. गेल्या 51 दिवसांपासून देशभरात विविध ठिकाणी स्थलांतरीत कामगार अडकून पडले आहेत. उद्यापही लॉकडाऊन संपण्याची चिन्हे नसल्याने मजूर कुठल्याही मार्गा ने घरी जाण्याचा मार्ग निवडत आहेत.


उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर-सहारनपूर महामार्गावरुन बिहारमधील स्थलांतरित मजूर आपल्या घरी पायी निघाले असताना ही दुर्देवी घटना घडली. पायी निघालेल्या मजूरांच्या एका जत्थ्याला अचानक भरधाव बसने उडवलं. यातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला.


दुसऱ्या एका घटनेत बुधवारी रात्री महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशकडे निघालेल्या मजुरांच्या ट्रकला झालेल्या भीषण अपघातात झाल्याने त्यात 8 जणांना आपला जीव गमवावा लागला. तर 50 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. मध्यप्रदेशातील गुना येथे हा अपघात झाला आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

औरंगाबादमध्ये 8 मे रोजी मालगाडीच्या धडकेत 16 मजुरांचा मृत्यू झाला होता.  जालना-औरंगाबाद मार्गावर करमाडजवळ हा अपघात घडला होता. हे सर्व मजूर जालन्यातून भुसावळला जात असतानाच पहाटे चार वाजता ही दुर्दैवी घटना घडली होती. हे सर्व मजूर जालन्यातील एका खाजगी कंपनीत काम करत होते.