नवी दिल्ली : भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर बालाकोटमध्ये नेमक्या किती दहशतवाद्यांचा खात्मा झाला, यावरुन भाजप आणि काँग्रेसमध्ये घमासान पाहायला मिळालं. मात्र परदेशी पत्रकार फ्रान्सेस्का मॅरिनो यांनी बालाकोटमध्ये जैश ए मोहम्मदचे 130 ते 170 दहशतवादी मारले गेल्याचा दावा केला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे एअर स्ट्राईकमध्ये जखमी झालेल्या दहशतवाद्यांवर पाकिस्तानच्या सैन्याकडूनच उपचार सुरु असल्याचा दावाही मॅरिनो यांनी केला आहे. मूळच्या इटलीच्या पत्रकार असणाऱ्या मॅरिनो यांच्या रिपोर्टनंतर पाकिस्तानचं पितळ पुन्हा उघडं पडल्याचं दिसत आहे.

काय आहे दावा?

'या प्रकरणाचे तपशील आता हळूहळू बाहेर येत आहेत. माहिती बाहेर यायला वेळ लागतोय कारण माझे सूत्र आणि तिथली लोकं घाबरलेली आहेत. पाकिस्तानी सैन्य आणि जैशकडून सर्व कथानक रचलं गेलं. काही ठराविक पत्रकारांना सैन्याने त्या जागी नेलं. ज्या ठिकाणी नेलं ती सर्व जागा सैन्याकडून वेढलेली होती. त्यांनी मदरशामध्ये नेलं.



ज्या मदरशात पत्रकारांना नेण्यात आलं त्या जागेवरील पुरावे आधीच नष्ट केल्याचं माझ्याकडे असलेल्या फोटोंवरुन स्पष्ट दिसतंय. कॅम्प हा दोन किलोमीटरवर पसरलेला आहे. पण ज्या ठिकाणी एअर स्ट्राईक झाला तेथे पत्रकारांना नेण्यात आलं नाही. त्यांनी स्वतःसाठी सोयीस्कर जागा दाखवली. ते आटपतं घेण्यासाठी विनंती करत होते.

मदरशात असलेल्या मुलांना काहीच प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी परवानगी दिली होती. आता तुम्हीच मला सांगा की मुलांसाठी मदरसा गावापासून दूर आणि तेही एक ते दीड तासाच्या डोंगर चढाई नंतर कोण बांधेल? आणि माझ्या सूत्रांकडून असंही कळलं की मेंढीपालन करणाऱ्यांनाही त्या ठिकाणी जाण्यास सैन्याने परवानगी नाकारली होती.'