मुंबई : देशातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता विरोधी पक्षांनी रविवार (2 मे) केंद्र सरकारला मोफत लसीकरण अभियान चालवण्याचा आग्रह केला. याबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह इतर राज्यातील प्रादेशिक पक्षांनी एकत्रित पत्रक काढलं आहे. यामध्ये केंद्राने देशातील सगळ्या रुग्णालय आणि आरोग्य केंद्रांमधील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणीही करण्यात आली आहे.
या पत्रकात म्हटलं आहे की, "देशात कोरोनाची महामारा ज्यावेगाने पसरत आहे, ती पाहता आम्ही केंद्र सरकारकडे मागणी करतो की देशातील सर्व रुग्णालय आणि आरोग्य केंद्रांमधील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करावा. सोबतच सरकारने तातडीने देशातील लोकांचे मोफत लसीकरण करावे. याशिवाय अर्थसंकल्पात लसीकरणासाठी तरतूद केलेल्या 35 हजार कोटींचा वापर मोहिमेसाठी करावा."
या पत्रकावर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, जनता दल (सेक्युलर) चे एच डी देवेगौडा, डीएमकेचे प्रमुख एम के स्टॅलिन, बसपाच्या प्रमुख मायावती, सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव, राजदचे तेजस्वी यादव, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल, डावे नेते डी.राजा, सीताराम येचुरी यांच्या स्वाक्षरी आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभरातील रुग्णालयात बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पुरवठ आणि औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्ण दगावले आहेत. त्यातच काही राज्यांनी आम्हाला आवश्यक असणारा ऑक्सिजन, औषधांचा पुरवठा केंद्राने केला नसल्याची तक्रारही केली आहे.
दरम्यान 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा 1 मे पासून सुरु झाला. परंतु लसीच्या पुरवठ्याअभावी महाराष्ट्रासह बऱ्याच राज्यांमध्ये मोजक्या प्रमाणात लसीकरण होत आहे.