गांधीनगर : करोडोंचं वैभव लाथाडून गुजरातमधील सुरतमधल्या एका बालकाने वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी संन्यास घेतला. नकळत्या वयात त्याने ही भीष्मप्रतिज्ञा नेमकी का आणि कशासाठी केली, हे अत्यंत रंजक आहे.


मोराची नक्षी असलेला रंगीबेरंगी रथ, हिरे-मोत्याच्या माळा घालून नवरदेवासारखा नटलेला चिमुकला. सुरतमध्ये निघालेली मिरवणूक थोडीशी वेगळी होती. अवघ्या 12 वर्षांच्या भव्य शाहने खेळण्या-फिरण्याच्या वयात वेगळा मार्ग निवडला. तो म्हणजे संन्यासी होण्याचा.

जैन धर्मातील साधू होण्याचं भव्यचं स्वप्न होतं आणि त्याला प्रेरणा मिळाली तीही घरातून. भव्यच्या बहिणीने चार वर्षांपूर्वी दीक्षा घेतली होती. त्यातून प्रेरणा घेत भव्यनेही जैन धर्मात साधू होण्याचं आणि दीक्षा घेण्याचं स्वप्न पाहिलं.

भव्य हा हिरे व्यापारी दीपेश शाह यांचा धाकटा मुलगा आहे. हिरे व्यापाऱ्याचा मुलगा म्हणजे तोंडात सोन्याचा चमचा. रेसिंग कार आणि पर्यटन असे महागडे शौक त्याला होते, पण त्यांचाही भव्यने त्याग केला, फक्त आई वडिलांच्या इच्छेखातर.

शाह परिवार खुश आहे. आपल्यापेक्षा वयाने लहान असूनही दीक्षा घेतल्यानंतर तो माझ्यापेक्षा मोठा होईल, त्यामुळे आपण खूप खुश आहोत, अशा भावना भव्यच्या भावाने व्यक्त केल्या.

संन्यास्थाश्रमाचं वय हे खरं तर आयुष्याच्या संध्याकाळी उजाडतं. पण भव्यने खेळण्या-बागडण्याच्या वयातच हा स्तर गाठला, जो सामान्य माणसांसाठी अनाकलनीय आहे.