बंगळुरुत राहणाऱ्या एका आजीबाईंनी 25 डिसेंबरला वयाची 107 वर्ष पूर्ण केली. आजी बर्थडे केक कापत असतानाचा फोटो त्यांची नात दीपाली सिकंद यांनी ट्विटरवरुन शेअर केला. 'आजीने राहुल गांधींची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. मी विचारलं का, तर ती म्हणाली... कारण तो हँडसम आहे.' असं कॅप्शन दीपाली यांनी फोटोला दिलं.
काही तासातच दीपाली यांच्या ट्वीटला रिप्लाय आला, तो होता साक्षात राहुल गांधी यांचा. 'प्रिय दीपाली, तुझ्या सुंदर आजीला माझ्याकडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दे. आणि नाताळच्या शुभेच्छा सांग. तिला माझ्याकडून एक मोठ्ठी मिठी मार. तुमचाच राहुल' असं ट्वीट राहुल गांधींनी केलं.
राहुल यांच्या ट्वीटनंतर दोन तासातच दीपाली यांनी पुन्हा ट्वीट केला. 'राहुल यांनी केलेला ट्वीट पुरेसा नव्हता की काय, म्हणून त्यांनी स्वतः फोन करुन माझ्या आजीला बर्थडे विश केलं. हीच खरी माणुसकी.' असं म्हणत दीपाली यांनी सर्व शुभेच्छुकांचे आभार व्यक्त केले.