नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठासह किमान 10 शैक्षणिक संस्थांच्या अधिकृत वेबसाईटवर ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशी घोषणा टाकून ही वेबसाईट हॅक करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी घडला. यामध्ये अलिगड मुस्लीम विद्यापीठ, आयआयटी दिल्ली आणि आयआयटी बीएचयू या प्रमुख शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.

पाकिस्तान हॅकर्स क्रू (PHC) या हॅकर्स समूहाने शैक्षणिक संस्थांची वेबसाईट हॅक केल्याची जबाबदारी घेतली आहे. तसेच हॅक केलेल्या वेबसाईटशी आपण कोणतीही फेरफार अथवा चोरी केलेली नसून केवळ भारतीयांना समज दिली असल्याचे संदेशात म्हटलं आहे

वेबसाईट हॅक केल्यानंतर त्यावर, "भारत सरकार आणि भारतीयांचे तथाकथित नायक काश्मीरमध्ये काय करत आहेत हे तुम्हाला माहित आहे का? काश्मीरमधील निर्दोषांना ते मारत आहेत, हे तुम्हाला माहित आहे का?" असा संदेश लिहला आहे.



पीएचसीकडून हॅक करण्यात आलेल्या वेबसाईटमध्ये कोटा विद्यापीठ, ग्रेटर नोएडामधील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड  टेक्नॉलॉजी, डिफेंस इन्सिट्यूट ऑफ अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी, कोलकातामधील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नॅशनल एअरोस्पेस लॅबोरेट्रीज आणि बोर्ड ऑफ रिसर्च इन न्यूक्लिअर सायन्स (BRNS) आदी संस्थांचा समावेश आहे.