नवी दिल्ली : माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते मनमोहन सिंह यांनी नोटाबंदीनंतर देशातील गोंधळावरुन पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला. नोटाबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना नियोजनात मोठं अपयश आलं असून, ही एकप्रकारे संघटित लूट आहे, असं सरकारला मनमोहन यांनी सुनावलं.


माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या भाषणातील 10 मुद्दे -

  1. नोटा रद्द करण्याच्या निर्णयाच्या उद्देशाशी असहमत नाही. मात्र, अंमलबजावणीत ढिसाळ नियोजन दिसून आल्या, ज्याबाबत संपूर्ण देशाचं दुमत नाही.


 

  1. मी पूर्ण जबाबदारीने सांगू शकतो की, आपल्या कुणालाही माहित नाही की, या निर्णयाचा शेवट काय असेल.


 

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं म्हणणं आहे की, 50 दिवस थांबा. खरंतर हा अत्यंत कमी कालावधी आहे. मात्र, गरीब आणि वंचितांसाठी हे 50 दिवस एखाद्या छळासारखं आहे. आतापर्यंत या निर्णयाने 60 ते 65 जणांचा बळी घेतला आहे.


 

  1. लोकांनी आपला पैसा बँकेत जमा केला, मात्र ते काढू शकत नाहीत. ही एकमेव गोष्ट या निर्णयाचा निषेध करण्यासाठी पुरेशी आहे.


 

  1. कृषी, असंघटित क्षेत्र आणि लघु उद्योगावर नोटबंदीचा वाईट परिणाम झाला आहे आणि लोकांचा मुद्रा आणि बँकिंग व्यवस्थेवरचा विश्वास उडत चालला आहे.


 

  1. लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी पंतप्रधानांनी या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी काही ठोस प्रस्ताव सादर करण्याची गरज आहे.


 

  1. प्रत्येक दिवशी नियम बदलत आहेत. यामुळे पंतप्रधान कार्यालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची प्रतिमा मलीन होते आहे.


 

  1. आरबीआयवर टीका होते आहे, याचं मला वाईट वाटतं आहे. मात्र, टीका अपरिहार्य आहे.


 

  1. या निर्णयाला ज्याप्रकारे अंमलात आणलं गेलंय, त्यावरुन हे स्पष्ट झालं की, नियोजनात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. किंबहुना, हा एकप्रकारे संघटित लूटीचं प्रकार आहे.


 

  1. मला आशा आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील गरिब-वंचितांना दिलासा देण्यासाठी व्यावहारिक पावलं उचलतील.