कटक : निकोलस पूरन आणि कर्णधार कायरन पोलार्डच्या स्फोटक खेळीमुळे वेस्ट इंडिजनं टीम इंडियासमोर 316 धावांचं आव्हान ठेवलं आहे. विंडीजनं मर्यादित 50 षटकांत पाच बाद 315 धावांचा डोंगर उभारला. निकोलस पूरननं 64 चेंडूत 89 धावा कुटल्या. तर पोलार्डनं तीन चौकार आणि सात षटकारांसह 73 धावा फटकावल्या. भारताला आता हा सामना जिंकत मालिका जिंकण्यासाठी 316 धावांची गरज आहे.
अखेरच्या वन-डे सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये टिच्चून मारा करत विंडीजला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही, मात्र अखेरच्या षटकांमध्ये पूरन आणि पोलार्ड जोडीने फटकेबाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. सुरुवातीलाल शाई होप आणि एविन लुईस यांनी पहिल्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी केली. मात्र यासाठी त्यांनी बरेच चेंडू खर्च केले. रविंद्र जाडेजाने विंडीजची जोडी फोडली. यानंतर रोस्टन चेस, हेटमायर आणि होप यांनी फटकेबाजी करत विंडीजचं आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न केला. मात्र सैनीने हेटमायर आणि चेसला तर शमीने होपला माघारी धाडत विंडीजला धक्का दिला.
भारताकडून नवदीप सैनीने 2 तर रविंद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतली.
वेगवान गोलंदाज नवदीप सैनीचं पदार्पण
भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीनं आज विंडीजविरुद्धच्या सामन्यात वन डे पदार्पण केलं. भारताकडून वन डे खेळणारा सैनी हा 229 वा खेळाडू ठरला. सामना सुरु होण्याआधी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या हस्ते सैनीला वन डे कॅप प्रदान करण्यात आली. सैनीनं याआधी ऑगस्ट 2017 साली आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी ट्वेन्टीत पदार्पण केलं होतं. त्यानं आजवर 48 लीस्ट ए सामन्यांमध्ये 79 विकेट्स घेतल्या आहेत
शाय होपच्या तीन हजार धावा पूर्ण
विंडीजचा सलामीवीर शाय होपनं कटकमध्ये वन डे कारकीर्दीत तीन हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. होपनं अवघ्या 67 डावात ही कामगिरी करुन हाशिम अमलानंतर सर्वाद जलद तीन हजार धावा पूर्ण करण्याचा मान मिळवला. आमलानं 57 डावांत तीन हजार धावांचा टप्पा गाठला होता.
विंडीजचं टीम इंडियासमोर विजयासाठी 316 धावांचं आव्हान, पूरन, पोलार्डची स्फोटक खेळी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Dec 2019 05:36 PM (IST)
अखेरच्या वन-डे सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये टिच्चून मारा करत विंडीजला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही, मात्र अखेरच्या षटकांमध्ये पूरन आणि पोलार्ड जोडीने फटकेबाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -