नवी मुंबई : तळोजा एमआयडीसीमध्ये लॉकडाऊन उघडल्यानंतर सुरू करण्यात आलेल्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात प्रदूषण करण्यास सुरुवात केली आहे. हवा आणि पाणी प्रदूषण पातळीत वाढ झाल्याने पनवेल मधील अनेक भागात याचा त्रास होत आहे. लोकांच्या तक्रारी नंतर आता प्रदूषण करणाऱ्या 8 कंपन्यांवर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने कारवाई केली आहे.


नवी मुंबई, पनवेल भागाला लागून तळोजा एमआयडीसीचा मोठा भाग येतो. या एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनी, फूड प्रोसेसिंग, इंजिनिअर अशा विविध विभागात काम करणाऱ्या कंपन्याची संख्या मोठी आहे. लॉकडाऊन उघडल्यानंतर तळोजा एमआयडीसी मधील कंपन्यांमुळे हवा आणि पाणी प्रदूषणाची पातळी कमालीची वाढलेली आहे. यामुळे तळोजा एमआयडीसीच्या आजूबाजूला असलेल्या गावांना, खारघर भागातील रहिवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या विरोधात गेल्या अनेक वर्षात बऱ्याच तक्रारी करूनही महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर केली जात नाही. त्यामुळे येथील लोकप्रतिनिधींना तळोजा एमआयडीसी प्रदूषणा विरोधात न्यायालयात धाव घ्यावी लागली आहे.


coronavirus | लॉकडाऊनमुळे समुद्र प्रदूषणमुक्त


लोकांनी अनेकवेळा तक्रारी केल्यानंतर उशीरा जाग आलेल्या महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून तळोजा एमआयडीसी मधील 8 कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यातील 4 कंपन्यांचे पाणी आणि विज तोडून उत्पादन थांबविण्यात आले आहे. तर बाकीच्या चार कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. पुढील काळात दिवस आणि रात्री दोन्ही वेळेस विशेष पथकाच्या माध्यमातून प्रदूषणाचा सर्वे करीत कंपन्यांवर कारवाई करणार असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.


City Centre Mall Fire | मुंबईतील सिटी सेंटर मॉलची आग 11 तासांनंतर धुमसतीच, शेकडो जणांची सुटका