नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एसओ. 4252 (ई) अन्वये 26 नोव्हेंबर 2020 रोजी ‘दुचाकी मोटार वाहनस्वारांसाठी हेल्मेट आदेश 2020’ जारी केला आहे. अनिवार्य बीआयएस प्रमाणपत्र आणि गुणवत्ता नियंत्रण आदेशाअंतर्गत दुचाकी स्वारासाठी संरक्षक हेल्मेटचा समावेश करण्यात आला आहे. देशातील हवामानाच्या अनुषंगाने भारतामध्ये वजनाने हलके हेल्मेट वापरण्या संदर्भात विचार करण्यासाठी आणि हेल्मेट घालण्यासंदर्भात नागरिकांमध्ये अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी रस्ता सुरक्षाविषयक सर्वोच्च न्यायालयाच्या समितीच्या निर्देशानुसार एक समिती स्थापन करण्यात आली आहे.


या समितीमध्ये एम्समधील तज्ञ डॉक्टरांसह आणि बीआयएस तसेच विविध क्षेत्रातील तज्ञ यांचा समावेश आहे. मार्च 2018 मध्ये समितीने आपल्या अहवालातील सखोल विश्लेषणानंतर देशामध्ये वजनाने हलके असलेले हेल्मेट वापरण्याची शिफारस केली आणि मंत्रालयाने तो अहवाल स्वीकारला. समितीच्या शिफारशींनुसार, बीआयएसने काही वैशिष्ट्यांमध्ये सुधारणा केली असून यामुळे वजनाने हलकी हेल्मेट तयार करणे अपेक्षित आहे. भारतीय बाजारपेठेत असलेली चांगली स्पर्धा आणि असंख्य हेल्मेट उत्पादक कंपन्यांमुळे आता चांगल्या प्रतीची आणि वजनाने हलक्या असणाऱ्या हेल्मेट्सचे उत्पादन करण्यास सहाय्य मिळेल अशी अपेक्षा आहे.


भारतात दरवर्षी एकूण सुमारे 1.7 कोटी दुचाकींचे उत्पादन होते.आता देशात दुचाकी वाहनांसाठी केवळ बीआयएस प्रमाणित दुचाकी हेल्मेट उत्पादित केली जातील आणि विकली जातील. यामुळे देशातील हलक्या प्रतीच्या दुचाकी हेल्मेटच्या विक्रीला आळा घालण्यास मदत होईल. दुचाकी अपघातांमध्ये नागरिकांना होणाऱ्या प्राणघातक जखमा कमी होण्यासही यामुळे मदत होईल.