हैदराबाद : हैदराबादमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. गेल्या 24 तासात 20 सेंमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्याने संपूर्ण शहरात पाणी साचलं आहे. अनेक गाड्या या पाण्यात वाहून गेल्या आहेत. हवामान खात्याने आजही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पावसाच्या विविध घटनांमध्ये आतापर्यंत एकूण 14 लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. शहराच्या चंद्रायनगुट्टा या भागात पावसामुळे काही घरांच्या भिंती कोसळल्याने तीन लहान मुलांसह नऊ जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. या परिसरात बचावाचे कार्य युद्धपातळीवर सुरु आहे.


प्रशासनाने लोकांना त्यांच्या घरी राहण्याचे आवाहन केले आहे. यासंबंधी तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव उच्चस्तरीय बैठक घेत आहेत. त्यांनी राज्याचे मुख्य सचिव सोमेश कुमार यांना राज्यात पुढच्या दोन दिवसासांठी हाय अलर्ट जाहीर करण्याचे आणि बचाव कार्य युध्दपातळीवर सरू करण्याचे आदेश दिले आहेत.


चंद्रायनगुट्टा भागात ही घटना घडली तेव्हा AIMIM चे खासदार असदुद्दीन ओवेसी त्या ठिकाणी पोहोचले. स्थानिक लोकही या मदत कार्यात भाग घेत आहेत. यानंतर नुकसानीचा अंदाज घेतला जाईल.





हैदराबादमध्ये सर्वात जास्त पावसाची नोंद एलबी नगर परिसरात झाली आहे. गेल्या 24 तासात तिथे 25 सेमी इतका पाऊस झाला आहे. काल संध्याकाळी 6 वाजल्यानंतर पावसाचे प्रमाण वाढले आणि ते रात्रभर कायम होते. मुख्यमंत्र्यांनी या घटनेवर प्रशासनाकडून अहवाल मागवला आहे. SDRF ची टीम सर्व शहरभर बचाव कार्य करण्यात गुंतली आहे.





शहराच्या मध्यभागी असणारा हुसेन सागर तलाव जो याआधी अर्धा भरला होता, या पावसानंतर तो पूर्ण भरुन त्याचे पाणी सर्वत्र रस्त्यावर पसरत होते. हैदराबाद महानगरपालिकेचे आयुक्त लोकेश कुमार यांनी शहरातील नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.


पाच राज्यांत हवामान विभागाने दिला हाय अलर्ट
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या  कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तेलंगणा राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली. बंगालच्या उपसागरातील निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पावसाचा हा पट्टा तेलंगणाकडून महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे हैदराबाद शहरासोबतच तेलंगणाच्या इतर भागातही पावसाची शक्यता आहे.


हवामान विभागाने मुसळधार पावसासोबतच विजांपासूनही सावध राहण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. महाराष्ट्रातही आज कडक विजांसह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि पालघरसह संपूर्ण कोकण प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.


महाराष्ट्रासहित कर्नाटक राज्याच्या किनारपट्टी प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे या प्रदेशातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आंध्र प्रदेशच्या काही भागातील नागरिकांनाही काळजी घेण्याचे आवाहन केले गेले आहे. हवामान खात्याने महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यात रेड अलर्ट जाहीर केला आहे.