विरार : मी सर्व जिंकलेल्या उमेदवारांना मत दिलं, अशी प्रतिक्रिया बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी दिली. राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha result) भाजपचे तीन आणि महाविकास आघाडीचे तीन उमेदवार निवडून आले. शिवसेनेचा (Shiv Sena) दुसरा उमेदावर संजय पवार (Sanjay Pawar) यांचा पराभव झाला.  या पराभवानंतर आता महाविकास आघाडी विशेषत: संजय राऊत यांच्याकडून कुणी कुणी मतं दिली नाहीत त्याचा थेट उल्लेख केला जात आहे. संजय राऊतांच्या आरोपानंतर हितेंद्र ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 

हितेंद्र ठाकूर म्हणाले, "आम्ही सर्व विजयी उमेदवारांना मत दिलं आहे. मी कुठल्याही दबावाला किंवा अमिषाला बळी पडून मत देत नाही". 

हितेंद्र ठाकूरांचं रहस्य अजूनही गुलदस्त्यात

दरम्यान, हितेंद्र ठाकूर हे कालपासून आपण जिंकलेल्या उमेदवाराला मत दिल्याचं सांगत आहेत. पण त्यांनी भाजप की महाविकास आघाडी कोणाला मत दिलं हे सांगितलं नाही. कारण भाजपचे तीन आणि महाविकास आघाडीचे तीन उमेदवार निवडून आले आहेत. 

संजय राऊत मला ओळखतात

यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर दिलं. "जर संजय राऊत म्हणत असतील की आम्हाला वोट दिले नाही त्यांची लिस्ट बनवली आहे, तर राऊत माझ्याबद्दल असं बोलणार नाहीत. ते मला चांगले ओळखतात", असं हितेंद्र ठाकूर म्हणाले. 

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?

राज्यसभा निवडणुकीत मित्रपक्षांनी आमच्याशी दगाबाजी केली नाही. पण घोडेबाजारात उभे होते त्यांची सहा सात मतं आम्हाला मिळाली नाहीत. आम्ही कोणत्या व्यवहारात पडलो नाही. आणि कुठला व्यापार केला नाही. तरीही संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 33 मतं मिळाली. हा सुद्धा आमचा एक विजय आहे. ज्या कुणी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची यादी आमच्याकडे आहे. बहुजन विकास आघाडीचे तीन आमदारांची तीन मतं आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, स्वाभिमानीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मतं दिली नाहीत, असा दावा संजय राऊत यांनी केला. 

संबंधित बातम्या  

Sanjay Raut : 'ज्यांनी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची यादी आमच्याकडे'; संजय राऊतांनी थेट नावं सांगितली