Shasan Applya Daari In Hingoli : गेल्या अनेक दिवसापासून सतत लांबणीवर पडत असलेला हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील शासन आपला दारी (Shasan Applya Daari) हा कार्यक्रम अखेर 10 मार्चला घेण्याचं ठरलं आहे. या कार्यक्रमासाठी रामलीला मैदान हे ठिकाण निश्चित करण्यात आले असून, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil), आमदार तानाजी मुटकुळे (Tanaji Mutkule) यांच्यासह जिल्हा प्रशासनाने आज रामलीला मैदानाची पाहणी केली आहे. त्यामुळे शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी युद्ध पातळीवर तयारी सुरू करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा हा हिंगोली दौरा महत्वाचा समाजाला जात आहे. 


विशेष म्हणजे या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. यावेळी वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेतलेले पंधरा ते वीस हजार लाभार्थी या कार्यक्रमात सहभागी होतील.  या कार्यक्रमासाठी 300 ते 400 बसेसची व्यवस्था केली जाणार असून, वाढते तापमान लक्षात घेता टेंटची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी दिली आहे. 


अखेर मुहूर्त ठरला...


मागील काही दिवसांपासून सतत हिंगोली जिल्ह्यातील शासन आपला दारी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, कोणत्या ना कोणत्या कारणाने अनेकदा हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात यायचा. आता अखेर 10 मार्चला हिंगोलीत शासन आपल्या दारी कार्यक्रम घेण्याचे निश्चित झाले आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासन देखील कामाला लागले आहे. आता फक्त चार दिवस शिल्लक असल्याने लाभार्थी यांच्यापर्यंत पोहचून त्यांना कार्यक्रमासाठी आणण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे. 


शासकीय कार्यक्रमात राजकीय 'भाषणं' 


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रम महत्वाचा समजला जात आहे. कारण हा कार्यक्रम जरी शासकीय असला तरीही याच कार्यक्रमातून राजकीय वक्तव्य आणि भाषणं झाल्याचे यापूर्वीच्या कार्यक्रमात पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे या सभेतून सत्ताधारी पक्षातील नेते विरोधकांवर कशी आणि काय टीका करणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे. विशेष म्हणजे हिंगोली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात शासन आपल्या दारी कार्यक्रमाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी धोक्यात ? भाजपकडून हिंगोली लोकसभेवर दावा