हिंगोली : हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. एसटी कंडक्टरबाबत विद्यार्थिनींच्या तक्रारीची नोंद घेताना, संजय बांगर यांनी एसटी बस आगारप्रमुखांना कार्यालयात बोलावत सज्जड दम दिला. सोबतच एसटी कंडक्टरबाबत बोलताना त्यांनी जीभ घसरली. आगारप्रमुखांना ताकीद देताना बांगर यांनी एसटी कंटक्टरला उद्देशून शिवीगाळ केली. त्यामुळे आमदार बांगर जरी विद्यार्थिनींच्या तक्रारीवर कार्यवाही करत असले तरी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी वापरलेली भाषा योग्य नसल्याची प्रतिक्रिया उमटत आहेत.


दुधाळा, डिग्रस, पिंपरी, बोराजा या गावातील विद्यार्थिनींना घरी जाण्यासाठी वेळेवर बस मिळत नव्हती. तसेच एसटी कंडक्टर देखील विद्यार्थिनींशी उद्धट भाषेत बोलत असल्याने या विद्यार्थिनींना थेट आमदार संतोष बांगर यांचे कार्यालय गाठले. यावेळी विद्यार्थिनींनी आमदार संतोष बांगर (Santosh Banger) यांच्याजवळ त्यांची व्यथा मांडत एसटी कंडक्टरची (ST Conductor) देखील तक्रार केली. संतोष बांगर यांनी देखील या विद्यार्थिनींचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर त्यांनी तात्काळ आगारप्रमुखांना त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतलं. 


आगारप्रमुखांना दिला सज्जड दम


आमदार संतोष बांगर यांची आगारप्रमुखांना ताकीद देताना मात्र जीभ पुन्हा एकदा घसरली. संतोष बांगर यांनी शिवीगाळ करत आगारप्रमुखांना दम दिला. यावेळी त्यांनी कंडक्टरवरही कठोर कारवाई करण्यास आगारप्रमुखांना सांगितलं. जर पुन्हा माझ्याकडे अशी तक्रार आली तर अशा कंडक्टरला मी लोळेपर्यंत पायाखाली तुडवेन अशा शब्दांत संतोष बांगर यांनी ताकीद दिली आहे. संतोष बांगर यांच्या अशा शब्दप्रयोगांमुळे एका लोकप्रतिनिधीला अशी भाषा शोभत नसल्याच्या चर्चा आता हिंगोली जिल्ह्यात जोर धरु लागल्या आहेत. 


मी जितका चांगला तितकाच वाईट


मी जितका चांगला आहे तितकाच वाईट आहे असं म्हणत बांगरांनी या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी योग्य बससेवा पुरवण्यात यावी असं आगारप्रमुखांना सांगितलं आहे. तसेच या मुलांच्या बसमध्ये एखादी महिला कंडक्टर किंवा एखादा वयस्कर कंडक्टर देण्यास त्यांनी यावेळी आगरप्रमुखांना सांगितलं आहे. ही मुलं जर पुन्हा तक्रार घेऊन आली तर मी माझ्या भाषेत उत्तर देईन असं देखील बांगरांनी म्हटलं आहे. 


नेमकं काय घडलं? 


विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयामधून सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी बराच वेळ बसची वाट पाहावी लागते. तसेच जर कंडक्टरला काही विचारलं तर कंडक्टर या विद्यार्थिनींना उद्धटासारखी उत्तरं देतात. त्यामुळे या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी थेट बांगारांचं कार्यालय गाठलं. बांगरांनी विद्यार्थिनींची तक्रार ऐकून घेऊन तात्काळ आगारप्रमुखांना त्यांच्या कार्यालयामध्ये बोलावून घेतलं. या मुलांना वेळेवर घरी जाण्यासाठी बस मिळायला हवी असं बांगरांनी यावेळी सांगितलं. 


संतोष बांगर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात? 


संतोष बांगर हे अनेकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पण तरीही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचं पाहायला मिळालं आहे. यावेळी देखील त्यांची विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसमोर जीभ घसरली. त्यामुळे आता तरी बांगरांवर कारवाई केली जाणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. 


हेही वाचा : 


Nashik Talathi : नाशिकच्या तलाठी परीक्षेत गैरप्रकार, हायटेक कॉपीसाठी प्रशिक्षण कुठून? चौकशीसाठी दहा जणांचं पथक नेमलं!