Hingoli Rain Update : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. वसमत तालुक्यात 200 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यातील वसमत शिवारात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. मुसळधार पावसामुळे वसमत शहरालगत असलेला तलाव फुटला आहे, त्यामुळे अनेकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. त्यामुळे घरातील संसार उपयोगी साहित्य पूर्णपणे भिजलं आहे. तर अन्नधान्य सुद्धा या पाण्यात भिजल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे. 


तलाव फुटल्याने अनेक घरांत पाणी


आज या ठिकाणी हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी 15 टीम तयार करण्यात आल्या असून वसमत शहरात सुद्धा पंचनामे केले जाणार आहेत. तातडीची मदत म्हणून प्रत्येकाला 5 हजार रुपये दिले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे.


वसमत शहरातील रस्त्यावर अजूनही पाणीच पाणी 


वसमत तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. वसमत शहरालगत आसालेला तलाव फुटल्याने तलावाचे पाणी अनेकांच्या घरात शिरले आहे. वसमत शहरातील शुक्रवार पेठ, तथागत नगर, जुना गुरुद्वारा परिसर दर्गा मोहल्ला या भागात या तलावाचे पाणी शिरले आहे. वसमत शहरातील रस्त्यावर अजूनही पाणीच पाणी दिसत आहे.


जोरदार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान 


हिंगोली जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. नदी, ओढ्याला पूर आल्याने शेकडो हेक्टर शेती खरडली आहे. हिंगोली जिल्ह्यातील पळसगाव शिवारात सुद्धा शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अगोदरच उशिरा पाऊस पडल्याने शेतकरी हैराण होते. त्यात कशातरी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, त्यात आता हा पाऊस यामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे. शेतकरी सरकारकडे मदतीची अपेक्षा करू लागले आहेत.


पाहा व्हिडीओ : 



हिंगोली जिल्ह्यातील आठ मंडळात अतिवृष्टी


हिंगोली जिल्ह्यात गुरुवारी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील 8 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ओढे आणि नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे पुराचे पाणी शेतात शिरले आहे. शेकडो एकर शेती या पाण्यामुळे खरडून गेली आहे. सोयाबीन, कापूस, हळद, ऊस, केळी या पिकांना या पिकांचं फटका बसला आहे. पुरामुळे शेतातील माती पिकांसह वाहून गेली आहे. कापूस, सोयाबीन पिकाच्या मुळ्या उघड्या पडल्याने आता ही सर्व पिके नष्ट होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.