Hingoli Lok Sabha Constituency : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. दरम्यान, महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) जागावाटपाबाबत चर्चा देखील सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. अशात महाविकास आघाडीकडून मराठवाड्यातील (Marathwada) आठ लोकसभा मतदारसंघापैकी 7 लोकसभा मतदारसंघाच्या जागा वाटपाचा तिढा सुटला आहे. मात्र, हिंगोली लोकसभा मतदारसंघाची (Hingoli Lok Sabha Constituency) जागा वाटपाचा सस्पेन्स अजूनही कायम असल्याचे चित्र आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील करत आहेत. अशात हिंगोली लोकसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेसकडून सुद्धा दावा केला जातोय. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये हिंगोलीच्या जागेवर शिवसेनेकडून खासदार हेमंत पाटील हे उमेदवार होते. तर, काँग्रेसकडून माजी खासदार सुभाष वानखेडे रिंगणात होते. मात्र, सुभाष वानखेडे यांचा पराभव करून हेमंत पाटील विजयी झाले. त्यामुळे हिंगोलीची जागा शिवसेनेच्या ताब्यात आली. पुढे शिवसेनेत दोन गट झाले आणि हेमंत पाटलांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणं पसंत केले. त्यामुळे ठाकरे गटाच्या शिवसेनेसह काँग्रेसकडून या मतदारसंघावर अधिक जोर असल्याचे पाहायला मिळत आहे.
इच्छुकांची नावं...
हिंगोली लोकसभेच्या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादीकडून माजी मंत्री आणि सहकार क्षेत्रातील अनुभवी नेतृत्व म्हणून ओळख असलेले जयप्रकाश दांडेगावकर हे इच्छुक आहेत. त्याचप्रमाणे काँग्रेसकडून अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय आणि पेशाने डॉक्टर असलेले डॉ. अंकुश देवसरकर इच्छुक आहेत.
हिंगोलीची जागा महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाच्या वाट्याला?
मागील दोन टर्ममध्ये या ठिकाणी आघाडीकडून काँग्रेस पक्षाने हिंगोली लोकसभेची जागा लढवल्यामुळे, यंदाही हिंगोली लोकसभेची जागा काँग्रेसच्या ताब्यात येईल आणि अंकुश देवसरकर हे उमेदवार राहतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे महाविकास आघाडीत हिंगोली लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्षाच्या वाट्याला येईल असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जातोय. परंतु, हिंगोलीच्या जागा वाटपाचा तिढा हा सर्वात शेवटी सोडवला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
हिंगोलीच्या बदल्यात जालना लोकसभा मतदारसंघाची जागा सोडली जाण्याची शक्यता
हिंगोली लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस आणि ठाकरे गटाने एकाचवेळी दावा केल्याने महाविकास आघाडीत यावर कोणताही अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. मात्र, हिंगोली लोकसभा मतदारसंघावर दावा करणाऱ्या काँग्रेसकडून ठाकरे गटाला हिंगोलीच्या बदल्यात जालना लोकसभा मतदारसंघाची जागा सोडली जाण्याची शक्यता आहे. यावर चर्चा देखील सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
MP List of Marathwada : मराठवाड्यातील सर्व आठही खासदारांची यादी, कोणत्या पक्षाचे किती खासदार?