Lok Sabha Election 2024 : दुसऱ्या टप्प्यात उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपली असून, हिंगोलीत (Hingoli) महायुतीत बंडखोरी पाहायला मिळत आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात (Hingoli Lok Sabha Constituency) शिंदेसेनेचे बाबूराव कदम (Baburao Kadam) हे महायुतीचे उमेदवार आहेत. असे असतांना भाजप नेते शिवाजी जाधव (Shivaji Jadhav) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेता निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम राहण्याची भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी स्वतः शिवाजी जाधव यांच्याशी फोनवरून संपर्क साधून त्यांना उमेदवारी मागे घेण्याबाबत चर्चा केली होती.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेक पक्षात नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. तर काही मतदारसंघात बंडखोरी देखील पाहायला मिळत आहे. हिंगोली मतदारसंघात देखील अशीच बंडखोरी महायुतीत पाहायला मिळत आहे. भाजपचे लोकसभा मतदारसंघ प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर, श्याम भारती महाराज यांच्यासह भाजप नेते शिवाजी जाधव यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, गिरीश महाजन, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, आमदार श्रीकांत भारतीय यांच्या शिष्टमंडळाने रामदास पाटील सुमठाणकर आणि श्याम भारती महाराज यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करत दोघांना माघार घेण्यात यश मिळविले. याचवेळी महाजन यांनी शिवाजी जाधव यांच्याशी देखील फोनवरून चर्चा केली होती. पण, जाधव निवडणूक लढवण्यासाठी ठाम आहेत.
राहतं घर गहाण ठेवून कारखाना सुरू केला, आता निवडणूक लढवणारचं...
दरम्यान यावर बोलतांना शिवाजी जाधव म्हणाले की, "कार्यकर्ते आणि जनतेचा आग्रह असल्याने मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. गेल्या दहा ते बारा वर्षांपासून हिंगोली लोकसभा आणि वसमत विधानसभेमध्ये 80 टक्के समाजकारणात 20 टक्के राजकारण करण्यासाठी दिल्लीची मोठी वकीलची प्रॅक्टिस सोडून इथे आलो. मला दोनदा 2014 आणि 2019 साली विधानसभेला संधी मिळाली. 2019 साली भाजपने मला हिंगोली लोकसभेतून उमेदवारी जवळपास फायनल केली होती. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या शिष्टमंडळाला बोलले होते. युतीत मर्यादा असल्याने आणि शिवसेनेला हिंगोलीची जागा गेल्याने मला उमेदवारी मिळाली नव्हती. पण त्यावेळी देखील कार्यकर्ते आणि जनतेचा आग्रह असल्याने मी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचे मला आश्वासन देण्यात आल्याने मी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. पण विधानसभेत देखील युती झाली आणि मला अपक्ष निवडणूक लढवावी लागली. तेव्हाच जर मला पक्षाचे चिन्ह मिळाले असते, तर मी आमदार झालो असतो. वसमतमध्ये भाजपचे नाव सुद्धा नसतांना पंचायत समितीत सत्ता आणली, दोनदा टोकाई साखर कारखान्यावर निवडून आलोय. माझा राहतं घर गहाण ठेवून कारखाना सुरू केला, असे म्हणत जाधव यांनी आपली नाराजी व्यक्त केली. तसेच निवडणूक लढवण्यासाठी ठाम असल्याची देखील भूमिका मांडली.
इतर महत्वाच्या बातम्या :