Hingoli: हिंगोली शहरातील मारवाडी गल्लीमध्ये राहत्या घरात अवैधरित्या साठवलेल्या फटाक्यांना आग लागून (5 ऑक्टोबर) मोठी दुर्घटना घडल्यानंतर अखेर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आलं आहे. या दुर्घटनेत तीन घरं जळून खाक झाली, दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर दहा ते बारा जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर हिंगोली शहरातील अवैध फटाका साठ्यांविरोधात महसूल, नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे धडक कारवाई सुरू केली आहे. (Hingoli Fire)
आज हिंगोली शहरातील विविध ठिकाणी संशयित व्यापाऱ्यांच्या घरांवर आणि अवैध फटाका साठ्यांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईदरम्यान आतापर्यंत ट्रॅक्टरची एक ट्रॉली भरून फटाके जप्त करण्यात आले आहेत. जवळपास 2 क्विंटल वजनाचा फटाक्यांचा साठा जप्त केल्याची माहिती हिंगोली नगरपालिकेच्या मुख्याधिकारी प्रांजली मुंडे यांनी दिली.
अग्नितांडवाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
दरम्यान, हिंगोली शहरात झालेल्या अग्नितांडवाचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. फटाक्यांच्या गोदामाला आग लागल्यानंतर परिसरात आगीचे प्रचंड लोळ उठताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. आग वाढत असताना जीव वाचवण्यासाठी नागरिकांची अक्षरशः धावपळ सुरू होती. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या दुर्घटनेदरम्यान अग्निशमन दलाची गाडी फटाक्यांच्या गोदामासमोर उभी होती. या गाडीमुळे समोरील घरातील तीन जणांचे जीव वाचल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची तीव्रता समोर आलेल्या व्हिडिओतून स्पष्टपणे दिसून येत आहे.
घरांमध्ये अवैध फटाका साठा; प्रशासनाची तपासणी सुरू
मारवाडी गल्लीतील दुर्घटनेनंतर हिंगोली शहरातील अवैध फटाका साठ्यांची तपासणी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. महसूल, नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाकडून विविध ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.ज्या ठिकाणी कोणतीही कागदपत्रं, एनओसी किंवा परवाना नसताना फटाक्यांचा साठा करण्यात आला आहे, अशा साठ्यांवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती मुख्याधिकारी प्रांजली मुंडे यांनी दिली. त्यानुसार सकाळपासून हिंगोली शहरात कारवाई सुरू असून ट्रॅक्टर भरून फटाके जप्त करण्यात आले आहेत. आतापर्यंत सुमारे 2 क्विंटल वजनाचा फटाक्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
'दोन नागरिकांच्या जीवावर बेतलं'
हिंगोली नगरपालिकेच्या मुख्याधिकारी प्रांजली मुंडे यांनी प्रशासनाच्या कारवाईबाबत माहिती देताना सांगितलं की, ज्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रं, एनओसी किंवा परवाना नाही आणि रहिवासी भागात अवैधरित्या फटाक्यांचा साठा करून ठेवला आहे, अशा साठ्यांवर जप्तीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात फटाक्यांचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडल्याने प्रशासनाने ही कारवाई सुरू केली आहे. प्रत्येक सणाच्या आधी आग प्रतिबंधक उपाययोजना आणि एनओसीसंदर्भात संबंधित संस्थांना सूचना देणारी पत्रकं माध्यमांमध्ये प्रसिद्ध केली जातात. नागरिकांना फायर ऑडिट करण्याचं आवाहनही केलं जातं. मात्र त्याला नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचं त्या म्हणाल्या.रहिवासी भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा साठा करण्यात आला आणि त्यात दोन नागरिकांच्या जीवावर बेतलं. त्यामुळे आता प्रशासनाकडून अशा अवैध साठ्यांवर कारवाई केली जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
जप्त फटाक्यांची विल्हेवाट लावणार
दरम्यान, आतापर्यंत ज्या ठिकाणांहून फटाक्यांचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे, त्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहितीही समोर आली आहे. जप्त करण्यात आलेल्या फटाक्यांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. हिंगोली शहरातील मारवाडी गल्लीमध्ये 5 ऑक्टोबरच्या सायंकाळी घरात ठेवलेल्या फटाक्यांना आग लागून दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. दहा ते बारा जण गंभीर जखमी झाल्यानंतर आता प्रशासनाने रहिवासी भागातील फटाका साठ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई आज दिवसभर सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
