नांदेड : भाजप आमदार तानाजी मुटकुळे (BJP MLA Tanaji Mutkule) आणि त्यांच्या समर्थकांनी हिंगोलीच्या नरसी नामदेव संस्थांच्या (Narsi Namdev Trust) विश्वस्ताला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. अंबादास गाडे असं मारहाण झालेल्या विश्वस्ताचे नाव आहे. गाडे यांच्यावर आता हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून पाठीमध्ये खुर्च्यांनी मारहाण केल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. 


नरसी नामदेव संस्थां समितीच्या कामांचा हिशोब घेण्यासाठी 18 सप्टेंबर रोजी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत हिशोब विचारण्यावरून नरसी नामदेव येथील संस्थांचे विश्वस्त अंबादास गाडे यांना भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी बेदम मारल्याचा आरोप विश्वस्त गाडे यांनी केला आहे.


हिशोब मागितला म्हणून खुर्च्यांनी बेदम मारहाण


देशभरामध्ये परिचित असलेल्या संत नामदेव यांच्या जन्म गावी नरसी नामदेव येथे नामदेव महाराजांच्या मंदिराचा जिर्णोद्धाराचे काम सुरू आहे. या कामासंदर्भामध्ये जीर्णोद्धार समितीचा हिशोब मागण्यासाठी विश्वस्त मंडळीच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भाजप आमदार तानाजी मुटकुळे हे त्यांच्या समर्थकांसह उपस्थित होते. यावेळी विश्वस्त मंडळींनी जिर्णोद्धार समितीच्या कामाचा हिशोब मागितला असता आमदार संतापले. त्यानंतर आमदारांनी चक्क विश्वस्तालाच बेदम मारहाण केली आहे.


हिंगोली जिल्ह्यातील नरसी येथे संत नामदेव महाराजांचे असं ऐतिहासिक मंदिर आहे. भागवत धर्माची पताका खांद्यावर घेत साता समुद्रापार भागवत धर्माची महती सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे हे जन्मगाव आहे. भोंग्यांचा वापर न करता आरती करणार हे गाव आहे. याच मंदिराच्या ट्रस्टमधील हिशोबावरून झालेली मारहाण ही दुर्दैवी असल्याची गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.