Hingoli News Update : हिंगोली जिल्ह्यात पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केलीय. परंतु, जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात येणाऱ्या चार मंडळांना नुकसानीच्या कक्षेत बसत नसल्याने त्यांना मदत मिळणार नाही. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांना रक्ताने पत्र लिहीत प्रश्न उपस्थित केलाय. नामदेव पतंगे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. पतंगे यांनी रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडून आपली व्यथा मांडली आहे.
सेनगाव तालुक्यातील चार मंडळं अतिवृष्टीच्या मदतीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे पतंगे यांनी संताप व्यक्त केलाय. आम्ही महाराष्ट्रमध्ये राहत नाहीत तर बिहार मध्ये राहतोय की काय? आसा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहिलंय.
हिंगोली जिल्ह्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, हळद आणि तूर या पिकांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवल आहे. याच शेतीच्या नुकसानीची दखल घेत राज्य सरकारच्या वतीने जिल्हा प्रशासनाला पंचनामे करून मदतीसाठी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने संयुक्तिकरित्या हिंगोली जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले.
पंचनामे केलेल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मिळालेल्या माहितीनुसार 1.31 लाख शेतकऱ्यांचे 1.10 लाख हेक्टर शेत जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या शेती मधील नुकसानीच्या भरपाईसाठी 154 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. तो निधी मंजूर देखील करण्यात आला आहे. परंतु, सेनगाव तालुक्यातील चार मंडळामध्ये अतिवृष्टी झाली नसल्याचा ठपका ठेवत या भागातील शेतकऱ्यांना या मदतीपासून वंचित ठेवल्या जात आहे. त्यामुळे सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील शेतकरी नामदेव पतंगे यांनी रक्ताने पत्र लिहीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल केला आहे.
"आम्ही महाराष्ट्रात राहतो का बिहारमध्ये राहतो? अनेक शेतकरी पावसामुळे झालेल्या नुकसानीत आर्थिक संकटात आढळले आहेत. या शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची अपेक्षा होती.परंतु, मदतीच्या निकषातून या शेतकऱ्यांना वगळण्यात आलंय. त्यामुळे सेनगाव तालुक्यातील चार मंडळांमधील शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याने हे रक्ताने लिहिलेले पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.