आता आई-बाबाच्या गाडीवर बसणाऱ्या तमाम लहान चिमुरड्यांना देखील आता डोक्यावर भलं-थोरलं हेल्मेट घालण्यावाचून पर्याय नाही. बाबाच्या पुढ्यात बाईकच्या पेट्रोल टाकीवर बसणारे किंवा समोर सामानासोबत आईच्या पायाजवळ अॅडजस्ट होणारी ही बच्चेकंपनी इथून पुढे गाडीवर न्यायची म्हणजे पालकांच्या डोक्याला ताप असणार आहे. कारण, आतापर्यंत आठवणीनं स्वत:चं हेल्मेट सांभाळावं लागत होतं आता नव्या नियमांप्रमाणे या चिमुरड्या प्रवाशांची हेल्मेटंही बाळगावी लागणार आहे.
भारतात दरवर्षी दीड लाख अपघाती मृत्यू होत आहेत. 50 टक्के पेक्षा अधिक अपघात हे दुचाकींचे होतात आणि त्यात केवळ हेल्मेट न घातल्याने मृत्यू होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा अपघातात लहान मुलं देखील अनेकदा दगावत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. विद्यार्थी दशेतच मुलांना वाहतूकीचे नियम आणि ते नियम मोडल्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करुन दिली तर घरातील वाहन चालविणारी मोठी मंडळी हे नियम निश्चितच पाळतील अशी आशा प्रशासनाला आहे.
याच कारणांमुळे आता गाडीवर बसणाऱ्या लहान मुलांना देखील हेल्मेट घालणं बंधनकारक असणार आहे. गाडीवर बसलेल्या लहान मुलांनी जर हेल्मेट घातलं नसेल तर त्याचा दंड अर्थातच पालकांना भरावा लागणार आहे.
भारतात रस्ते अपघातांचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे. यामुळे केंद्र सरकारने सुरक्षेकडे अधिक लक्ष पुरविले आहे. लहान मुलांसाठी बाईकवर हेल्मेट घालावेच लागणार आहे. तर कारमध्येही सुरक्षेसाठी बूस्टरसीट बसवावी लागणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय मोटार वाहन संशोधन विधेयक 2019 मध्ये याची तरतूद केली आहे. याची अमलबजावणी आता सुरु केली जाणार आहे. दरम्यान हेल्मेटसक्तीला राज्यभरातून मोठा विरोध देखील होत असून आता या नव्या नियमानंतर हा विरोध आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.