मुंबई: येत्या 24 तासात मुंबईसह राज्यभरात पुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्यरात्रीपासून मुंबईत पावसाची रिमझिम सुरु आहे. राज्याच्या काही भागांमध्येही संततधार पाऊस बरसतो आहे.

 

गेल्या काही दिवसात कोकण, मराठवाडा, विदर्भात चांगला पाऊस झाला असला तरीही पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही पट्ट्यात अजून हवा तसा पाऊस झालेला नाही. सध्या नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल अरबी समुद्रकिनाऱ्याच्या उत्तर भागात अनुकूल असल्याने पुढच्या काही तासात राज्यात जोरदार पाऊस होऊ शकतो असं हवामान विभागाचं म्हणणं आहे.

 

दरम्यान, काल रविवार असल्यानं मुंबईकरांनी पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला. मरिन ड्राईव्ह, वरळी, जुहूच्या समुद्र किनाऱ्यांवर मुंबईकरांनी गर्दी केली होती. भरतीच्या वेळी समुद्र किनाऱ्यापासून लोकांना दूर करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

 

पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणीपातळीतही वाढ झाली आहे. मुंबईत वरूण राजाची कृपा चांगलीच राहणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.