जालना : दिवाळी संपल्यानंतर राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाटेची भीती यामुळे आणखी वाढत आहे. या परिस्थितीबाबत बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं की, राज्यात सध्यातरी लॉकडाऊन लावलं जाणार नाही. मात्र जे निर्बंध उठवले गेले आहेत, त्यामुळे बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत आहेत. अशाने कोरोनाचा धोना पुन्हा वाढला आहे. त्यामुळे राज्यात शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लावले जाऊ शकतात, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.


राज्यात निर्बंध लावण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही इच्छा आहे. लॉकडाऊन नसला तरी शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लावणार आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळली जात नसल्याने राज्य सरकार कठोर निर्णय घेणार आहे. दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर याबाबत घोषणा केली जाणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.


लग्नासाठी 200 जणांना दिलेल्या परवानगीबाबती पुर्नविचार करावा लागेल

दिवाळीच्या दिवसात टेस्ट कमी केल्या होत्या. मात्र आता कोरोनाच्या टेस्टही वाढवण्यात आल्या आहे. अशारीतीने टेस्टिंग वाढल्यात म्हणजे कोरोनाबाधितांची संख्याही वाढेल. याचा अर्थ लाट वैगेरे येईल असा होत नाही. मात्र काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. गरज पडल्यास कठोर पावलं उचलावी लागतील, असं राजेश टोपे यांनी म्हटलं. लग्न समारंभासाठी जी 200 जणांच्या उपस्थितीची परवानगी दिली होती त्याबाबत पुर्नविचार केला जाईल, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR टेस्ट अनिवार्य


मिशन बिगीन अगेन अंतर्गत नवे निर्देश जाहीर करण्यात आले आहेत. आता दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून येणाऱ्या फ्लाईट्स आणि रेल्वे प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR टेस्ट रिपोर्ट अनिवार्य करण्यात आलं आहे. ही टेस्ट किमान 4 दिवस आधी केलेली असावी, असंही त्यात नमुद करण्यात आलं आहे. कोरोनावर आळा घालण्यासाठी राज्य सरकार हळूहळू कठोर निर्णय घेणार आहे. त्यानुसार आता दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून येणाऱ्या फ्लाईट्स आणि रेल्वे प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR टेस्ट रिपोर्ट अनिवार्य करण्यात आलं आहे. 72 तासापूर्वीचा टेस्ट रिपोर्ट सादर करणे आवश्यक झाले आहे.


येत्या 8 ते 10 दिवसांत निर्णय घेणार : अजित पवार


बर्‍याच राज्यात कोरोना संक्रमण वाढले आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, येत्या 8 ते 10 दिवसांत परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल, त्यानंतर टाळेबंदीबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल.

संबंधित बातम्या