वाशिम : वाशिम जिल्ह्यातील रिसोड म्हणजे ऋषीवट नगरी अनेक साधुसंतांच्या पायभूमीने पावन झालेली भूमी आहे. या भूमीत अनेक साधूसंत राहत होते, तसंच जप-तप, अनुष्ठान आणि समाजसेवा करत होते, यामुळे कदाचित या नगरीला ऋषीवट नगरी म्हणून नाव प्राप्त झालं आहे. ही भूमी 21व्या शतकात शिवस्वरुप संत शिरोमणी अमरदास बाबा यांच्या पदस्पर्शाने मंगलमय झाली आहे, म्हणूनच हे ठिकाण रिसोडवासियांचं ग्रामदैवत झालं आहे.

अमरदास बाबांमुळे रिसोडवासियांचा उद्धार झाल्याची स्थानिकांची भावना

वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड गावचं ग्रामदैवत म्हणजे श्रीसंत अमरदास बाबा. सिद्धपुरूष असलेले अमरदासबाबा नेमके कुठले, ते कुठून आले, त्यांचं कुटुंब कुठलं याबाबतची कोणतीच माहिती उपलब्ध नाही. मात्र त्यांच्या वास्तव्यानं रिसोडवासियांचा उद्धार झाल्याची भावना इथल्या नागरिकांमध्ये आहे. त्यामुळेच श्रीसंत अमरदास बाबांना दैवत्व प्राप्त झालं, असं सांगितलं जातं.

बाबांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध उपक्रम

त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अनेक सामाजिक कामं रिसोडमधे होऊ लागली आहेत. दरवर्षी भाद्रपद महिन्यात त्यांचं पुण्यस्मरण केलं जातं. त्यानिमित्तानं त्यांची पालखी मोठ्या भक्तीभावानं मिरवली जाते. महाशिवरात्रीचं औचित्य साधून येथे विविध उपक्रम राबवले जातात. त्यांच्या नावानं उभारलेल्या ट्रस्टमार्फत परिसरात अनेक कामं करण्यात आली आहेत.

बाबा आजार दूर करतात अशी भाविकांची श्रद्धा

श्री अमरदास बाबांना योगी आणि शिवस्वरूप मानलं जातं. त्यांनी 50 वर्षापर्यंत निरंतर साधना केली आहे. दूरवरून भाविक भक्त आशीर्वाद घेण्यासाठी येथे येतात. 1958 मध्ये भक्तांनी भव्य मंदिर उभारलं आहे. याच मंदिरात दररोज अन्नदान केलं जातं. बाबांच्या पश्चात त्यांच्या दरबारातलं तीर्थ आणि विभूती हेच भक्तांसाठी औषध मानलं जातं. या औषधांनी अनेक विकार दूर झाल्याचा दावा त्यांचे भक्त करतात.

अमरदास बाबांच्या मंदिराजवळ हजारो वर्षांपूर्वीचे प्राचीन हेमाडपंथी सिद्धेश्वराचे मंदिरही आहे. याठिकाणी द्रौपदी कुंड आणि त्रिवेणी संगम आहे. इथल्या शांत आणि पवित्र वातावरणामुळेच बाबांनी याठिकाणी वास्तव्य आणि तपश्चर्या केली.

दर्शन झाल्यावर विसाव्यासाठी गंगा मा उद्यान तयार करण्यात आलं आहे. महाशिवरात्रीला होणाऱ्या बाबांच्या यात्रेला विदर्भातूनच नाही, तर संपूर्ण भारतातून लाखोंच्या संख्येत भाविक रिसोड नगरीत दाखल होत असतात. यादिवशी 15 दिवस मोठी यात्रा भरते.  सामान्य भक्तांच्या हाकेला धावून जाणाऱ्या अमरदास बाबा संस्थानला एकदा तरी नक्कीच दर्शनाला जावं असं भक्तांकडून सांगितलं जातं.

पाहा व्हिडीओ :