सांगली : पश्चिम महाराष्ट्रात गावोगावी  असणाऱ्या ग्रामदैवतांची मोठी ख्याती आहे. काहींचा इतिहास हा हजारो वर्षांपूर्वीचा तर काहीचा शेकडो वर्षांपूर्वीचा आहे. या ग्रामदेवतांनी श्रद्धेच्या माध्यमातून गावांना एकत्र बांधून ठेवलं आहे, तसंच लोकांना गुण्यागोविंदाने राहण्यास भाग पाडलं आहे.

श्रीभैरवनाथ हे विटेकरांचे ग्रामदैवत... 125 वर्षांपूर्वीचं हे मंदिर आजही तेवढ्याच दिमाखात उभं आहे. संपूर्ण सागवानी लाकडाच्या साहाय्यानं उभारलेलं कोरीव नक्षीकाम या मंदिरात पाहायला मिळते. शिसवच्या लाकडापासून हे कोरीव काम करण्यात आलं आहे.

भैरवनाथाचा जन्मोत्सव

चैत्र वद्य अष्टमी हा भैरवनाथ यात्रेचा मुख्य उत्सव आहे. अष्टमीदिवशी जन्मकाळ रुपात भैरवनाथाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. नवमीला विटा शहरात मोठा उत्सव भरतो. यावेळी शोभेचं मोठं दारुकाम आणि पालखी शर्यत आयोजित केली जाते. जवळपास चार पालख्या भैरवनाथाच्या मंदिरातुन निघतात.

भैरवनाथाचा पालखी उत्सव

नवरात्रोत्सवात भैरवनाथाची नऊ रुपात पूजा बांधण्यात येते. तर दसऱ्याला भैरवनाथाच्या पाच पालख्या निघतात. यात गायकवाड, शितोळे, पाटील आणि दोन सिद्धांच्या पालख्या निघतात. या दोन सिद्धांच्या पालख्यांची शर्यत असते. हा पालखी सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक हजर असतात. हे या भैरवनाथाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

125 वर्षांपूर्वी विठ्ठलराव आबासाहेब पाटील यांनी गावातील सर्व लोकांना एकत्र करुन मंदिराची उभारणी  केली आणि पालखी शर्यत सोहळ्याची परंपरा देखील सुरु केली. आज महाराष्ट्रभर ही शर्यत प्रसिद्ध झाली आहे.

भैरवनाथ : हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक

भैरवनाथ हे पांढरींच दैवत असून येथूनच पालख्याची सुरवात होते. ही ग्रामदेवता हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीकदेखील आहे. भैरवनाथाच्या पालख्या जवळच असलेल्या चावडी चौकात जातात. चावडी चौक म्हणजे मशीद. याठिकाणी हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येऊन हा सोहळा पार पाडतात. नवसाला पावणारा देव भैरवनाथ आहे. नवनाथांपैकी एक हा भैरवनाथ असून या देवाकडे भाविक नवस करतात.

भैरवनाथाचा इतिहास


विटा जवळ असलेल्या  वासुबे येथे भैरवनाथाचे  मंदिर होते.  वासुबे येथील भैरवनाथ हा विटा येथे मुक्कामाला होता. कुलकर्णींकडे असलेले हे दैवत नंतर ग्रामरुपात प्रस्थापित झाले आणि हा पांढरीचा देव म्हणून ओळखला जाऊ लागला. नवसाला पावणारा देव म्हणून भैरवनाथला कौल लावला जातो. दर गुरुवारी नाथाला कौल मागून भाविक आपले मागणे मागतात.

पाहा व्हिडीओ :