सातपुडा पर्वत रांगांमध्ये असलेलं हे मंदिर बडी बिजासनी माता मंदिर म्हणून सर्वदूर परिचित आहे . शिरपूर तालुक्याच्या उत्तरेला महाराष्ट्राची सीमा जिथं संपते आणि मध्य प्रदेश राज्याची सीमा सुरु होते अशा ठिकाणी हे बिजासनी माता मंदिर आहे.
सातपुडा पर्वत रांगांच्या कुशीत वसलेलं निसर्गरम्य मंदिर
या मंदिरातली बिजासनी मातेची मूर्ती स्वयंभू आहे. मंदिर परिसरात विविध देवदेवतांची देखील मंदिरे आहेत. पूर्वी या ठिकाणी छोटं हेमाड पंथीय शैलीतलं टुमदार मंदिर होतं. तब्बल 150 वर्षाचा इतिहास असलेल्या या मंदिराचा सांभाळ कधी काळी खाज्या नाईक या डाकूने देखील केला असल्याचं भाविक सांगतात. कारण त्यावेळी सातपुडा पर्वत रांगांच्या कुशीत असलेल्या या मंदिर परिसरात पूर्वी घनदाट झाडी होती. आणि या जंगलातच खाज्या नाईकचं वास्तव्य होतं.
साधारण सन 2000 मध्ये म्हणजे 16 वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याचं मंदिराचे विश्वस्त सांगतात. या मंदिराचा ट्रस्ट मध्यप्रदेशच्या अखत्यारीत आहे . पण या विश्वस्तमंडळात चार विश्वस्त महाराष्ट्राचे आहेत. तर उर्वरित सर्व सदस्य मध्यप्रदेशचे आहेत.
भाविकांसाठी खास सोयीसुविधा
दोन नवरात्री, चैत्रोत्सव हे मुख्य उत्सव या मंदिरात साजरे होतात. बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर परिसरात भक्त निवास आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यासाठी ट्रस्टच्याकडून आश्रमशाळा, विद्यालय, गोशाळा सुरु करण्यात आली आहे . मंदिरात येणारा भाविक हा उपाशी पोटी जाऊ नये म्हणून अन्नछत्र सुरु करण्यात आलं आहे. येथे सायंकाळी दररोज आरतीही केली जाते. या आरतीचं मुख्य वैशिष्ट म्हणजे केवळ वाद्य वाजवून धूपारती आणि भस्मारती केली जाते.
बिजासनी मातेचं हे मंदिर जरी मध्य प्रदेश सीमेवर असलं तरी सर्वाधिक भाविक हे महाराष्ट्रातून येत असतात. बिजासनी मातेची मनोभावे पूजा, आराधना केल्यास सर्व संकटं, दुःख दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मध्यप्रदेशात बिजासनी मातेची इतर ठिकाणी देखील मंदिर आहेत. मात्र महाराष्ट्र , मध्यप्रदेश सीमेवरील निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या बिजासनी मातेचं हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून परिचित असल्याने मुंबई-आग्रा महामार्गावरून प्रवास करणारा प्रवासी या ठिकाणी थांबून देवीचं दर्शन घेतल्यानंतरच पुढे प्रवास करतो.
पाहा व्हिडिओ :