मुंबई : शेतकरी आंदोलनाला मोठं यश आलं आहे. कारण सुकाणू समिती आणि सरकारच्या उच्चाधिकार मंत्रिगटाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघाला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी तत्वतः मान्य करण्यात आली आहे.
सुकाणू समितीचे सदस्य आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार मंत्रिगटाची सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. यावेळी शेतकरी संघटनांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
या बाबतीतले निकष ठरवण्यासाठी समिती नियुक्त केली जाईल. यामध्ये शेतकरी संघटनांचे प्रतिनिधीही असतील, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
शिवसेनेचे दिवाकर रावतेही सरकारच्या समितीमध्ये होते. या प्रश्नावर चर्चेच्या माध्यमातून सकारात्मक तोडगा काढल्यामुळे सरकारचे आभार मानले. तसंच शिवसेना कायम शेतकऱ्यांच्या पाठिशी असेल, असंही सांगितलं.
अधिवेशनापूर्वी कर्जमाफी न झाल्यास पुन्हा आंदोलन : राजू शेट्टी
सरकारने सकारात्मक चर्चा करुन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महत्वाचे निर्णय घेतल्याने 13 जूनला होणारा रोल रोको आणि आंदोलन मागे घेत असल्याचं सुकाणू समितीचे सदस्य आणि खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केलं.
सरकारने 31 ऑक्टोबरपासून अल्पभूधारकांना कर्जमाफी देण्याचं मान्य केलं होतं. मात्र त्याबाबत आक्रमक भूमिका घेत आजपासूनच कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली. त्यामुळे आजपासून शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळेल, अशी हमी सरकारने दिल्याची माहिती सुकाणू समितीचे सदस्य आणि खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं.
सरकारच्या तिजोरीत करदात्यांचा पैसा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा फायदा धनदांडग्यांना होऊ नये, यासाठी शेतकरी संघटनाही प्रयत्न करतील, असंही राजू शेट्टींनी सांगितलं.
मात्र अधिवेशनापूर्वी म्हणजे 25 जुलैपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही, तर पुन्हा आंदोलन केलं जाईल, असंही राजू शेट्टी म्हणाले.
स्वामिनाथन आयोगाच्या बाबातीत मुख्यमंत्री सर्वपक्षीयांसोबत पंतप्रधानांना भेटायला जातील. शेतकऱ्यांना कायम सरकारवर अवलंबून रहावं लागू नये, यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी गरजेच्या आहेत. त्यामुळे त्याबाबत आग्रही राहू, असंही राजू शेट्टींनी सांगितलं. शेतकऱ्यांना कायम सरकारवर अवलंबून रहायला लागू नये यासाठी भूमिका मागणार
रघुनाथ दादा पाटील
सकाळपासून सरकारशी सकारात्मक चर्चा झाली. सरसकट कर्जमाफीचा मुख्य आग्रह होता. त्यानंतर कसलीही अटतट न ठेवता सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयाने छोट्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असं सुकाणू समितीचे सदस्य रघुनाथ दादा पाटील यांनी सांगितलं.
शेतकरी आंदोलनामुळे नागरिकांना त्रास झाला. मात्र त्याचं फलित चांगलं मिळालं. त्यामुळे उद्याचं आंदोलन मागे घेत असल्याचंही रघुनाथ दादा पाटील यांनी सांगितलं.
रक्तदान करुन सरकारच्या निर्णयाचं स्वागत : बच्चू कडू
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनीही सरकारचे आभार मानले. यापुढच्या आंदोलनात रक्त वाहणार होतं. मात्र आता रक्तदान करुन या निर्णयाचं स्वागत करु, असं बच्चू कडू म्हणाले.
पुणतांबा गावाचे आभार
दरम्यान ज्या पुणतांबा गावातून शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली, त्या पुणतांबा गावाचे सर्वांनी आभार मानले. शिवाय शेतकरी आंदोलनाचा यापुढचा लढा असाच सुरु राहिल, असा निर्धारही व्यक्त केला.