पीकविम्याचे अर्ज स्वीकारण्याची मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवली
एबीपी माझा वेब टीम | 31 Jul 2017 11:25 PM (IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर आणि मुख्य सचिवांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर आणि मुख्य सचिवांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पीकविम्यासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत 31 जुलै 2017 पर्यंत होती. मात्र ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या घोळामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज जमा करायचे राहून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्ज 5 ऑगस्टपर्यंत बँकेच्या शाखांमध्ये स्वीकारले जातील. मुदतवाढ देतांना CSC (जनसुविधा केंद्र) येथे अर्ज स्वीकारले जाणार नाही. बँकेतच अर्ज स्विकारले जातील, असंही राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. बँकांना मुदतवाढीबाबत ई-मेलद्वारे त्यांचे वरिष्ठ कार्यालय आणि क्षेत्रीय स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सूचित करण्यात येईल, अशी माहिती पांडुरंग फुंडकर यांनी दिली.