गोंदिया: गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील घोगरा गावात कोब्रा सापासोबत स्टंटबाजी तरुणाच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. कोब्रा सापासोबत स्टंटबाजी करताना साप चावल्याने 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील घोगरा गावात ही घटना घडली आहे. 

सापासोबत स्टंटबाजी करन एका 30 वर्षीय तरुणाला चांगलाच महागात पडला आहे. यात त्याला आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील घोगरा येथे ही घटना घडली आहे. लक्की बागडे (30) असे मृतक तरुणाचे नाव आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील घोगरा या गावात कुंभरे यांच्या घरी साप निघाल्याची माहिती मिळताच लक्की बागडे साप पकडायला गेला. मात्र, साप पकडण्याचे कुठलेही प्रशिक्षण नसताना देखील लक्की बागडे या तरुणाने स्टंटबाजीसाठी तो साप पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोब्रा सापाने त्याच्या हाताला दंश केला. या घटनेचा व्हिडिओ देखील काढण्यात आला. दरम्यान, साप चावल्याने त्याला तातडीने भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील उपजिल्हा रुग्णांमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा रुग्णालय भंडारा येथे नेण्यात आले याच दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

त्या तरूणाने सापाला हातात पकडल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत, सर्वजण तरूणाला तो साप सोडून दे म्हणतात मात्र तो तसाच त्याला हातात घेऊन थांबतो, यावेळी साप तरूणाच्या अंगठ्याला चावा घेतो. त्या तरूणाचा अंगळा रक्ताने माखलेला दिसून येतो.

रिल्ससाठीचा स्टंट अंगलट, चारचाकीसह युवक कोसळला दरीत 

सडावाघापूर पठारावरील निसर्ग सौंदर्या बरोबर उलटा धबधबा, येथील परिसर पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, येथे येणाऱ्या काही तरुण पर्यटकांची स्टंटबाजी, युवकांची हुल्लडबाजी इथं मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ना पोलीस, ना प्रशासनाने तरुणाईच्या या हुल्लडबाजीवर अंकुश ठेवल्याचे पाहायला मिळते. त्यामुळेच, येथे अपघाताच्या घटनाही घडताना चित्र आहे. रिलसाठी स्टंट करण्याच्या नादात तब्बल 300 फूट खोल दरीत पर्यंटकांची गाडी कोसळून भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघाच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, हा युवक कारचा रेस वाढवून गाडी एकाच जागी फिरवत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे फिरता फिरता रिव्हर्स गेअरमध्ये गाडी दरीत कोसळल्याचंही दिसत आहे.  

कराड येथील काही युवक सडावाघापूर येथील उलटा धबधबा पाहून चारचाकी गाडीने गुजरवाडीच्या टेबल पॉईंटवर आले होते. याठिकाणी गाडीतील काही युवक खाली उतरले, तर यावेळी साहिल जाधव या युवकाने मोबाईल रिलसाठी गाडीबरोबर स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला. गाडीसोबत स्टंट करताना साहिलचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट 300 फूट खोल दरीत कोसळली. या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने गुजरवाडी येथील स्टंटबाज अपघाताचे सत्य बाहेर आले. यावेळी म्हावशी येथील स्थानिक गुराखी मंगेश जाधव व किंगमेकर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अपघातात जखमी झालेल्या साहिल जाधवला बाहेर काढल्याने त्याचा जीव वाचला. यावेळी पाटण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर हेही घटनास्थळी उपस्थित होते.