Manoj Jarange Patil :  मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली होती. फडणवीस यांचा  मला तुरुंगात टाकण्याचा आणि मला ठार मारण्याचा कट होता असा खळबळजनक आरोप केला होता. मनोज जरांगे पाटील यांच्या या टीकेवर भाजप नेते परिणय फुके (Parinay Phuke) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मनोज जरांगे पाटील यांचे डोकं फिरलं असल्याची टीका परिणय फुके यांनी केली आहे. 


परिणय फुके यांनी गोंदियात पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे यांच्यावर टीका केली. त्यांनी म्हटले की, मनोज जरांगे पाटील यांचे डोकं फिरले आहे. जरांगे पाटील हे कोणाची सुपारी वाजवतात हे सगळ्यांना माहित आहे. ज्या लोकांनी त्यांना सुपारी दिली आहे, तिच लोक जरांगे यांच्याकडून अशी टीका वदवून घेत असल्याचे परिणय फुके यांनी म्हटले. मनोज जरांगे पाटील यांनी आता स्वत: वर संयम ठेवावा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आरक्षणाचे स्वागत करावे असेही परिणय फुके यांनी म्हटले. मनोज जरांगे यांची लोकप्रियता घसरली आहे, त्यातून ते वैफल्यग्रस्त झाले असल्याचे फुके यांनी म्हटले. मराठा समाजाने देखील जरांगे पाटील यांची साथ दिली आहे. 


अनिल देशमुखांवर बोचरी टीका... 


राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यास सांगितले होते असा गौप्यस्फोट केला होता. परिणय फुके यांनी देशमुख यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. आतापर्यंत अनिल देशमुख यांनी शंभर कोटी खाल्ले नव्हते असे सांगत होते, पण आता त्यांच्या या वक्तव्यावरून अनिल देशमुख यांनी 100 कोटी खाल्ले असल्याचे कबूलच केले आहे, अशी बोचरी टीका ही फुके यांनी अनिल देशमुखांवर केली. 


मनोज जरांगेंचे आंदोलन स्थगित


मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत सुरू केलेले आमरण उपोषण स्थगित केले आहे. नारायणगडाचे मठाधिपती आणि गावातील महिलांच्याहस्ते ते उपोषण सोडलं आहे. ज्यूस पिऊन त्यांनी हे उपोषण सोडले असून तब्येत ढासळल्याने आमरण उपोषण स्थगित केल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांना गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी उपोषण मागे घेण्याचा आग्रह धरला होता. दरम्यान, आज सकाळीच तब्येत ढासळल्याने मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली होती.