गोंदियामधील टेकाटोला ते मुरुकडोह दंडारी गावातील नाल्यावरील पुलाखाली नक्षलवाद्यांनी मोठ्या प्रमाणात स्फोटके लपवून ठेवली होती. सालेकसा पोलिसांनी ही स्फोटके शोधून जप्त केली आहेत. यामुळे नक्षलवाद्यांनी रचलेला मोठा कट उधळण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
गेल्या महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी मोठा भूसुरंग स्फोट घडवून आणला होता. त्यामध्ये 15 जवान शहिद झाले. त्यामुळे पोलीस प्रशासनाने सीमावर्ती भागात रेड अलर्ट जारी केला होता.
गडचिरोली पोलिसांनी रेड अलर्ट जारी केल्यानंतर गोंदिया पोलिसांनीदेखील जंगल भागात तसेच दुर्गम भागातील रस्त्यांवरील पुलांखाली शोध मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान सालेकसा पोलिसांना दंडारी गावच्या रस्त्यावरील पुलाखाली स्फोटके शोधण्यात यश मिळाले आहे.