Gondia Leopard Attack : गेल्या काही महिन्यात गावोगावी येणाऱ्या बिबट्याची (Leopard) दहशत हा लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न बनला आहे. अशातच आता गोंदिया (Gondia News) जिल्ह्यात बिबट्याने हैदोस घातल्याचे प्रकरण समोर आलं आहे. बिबट्या दहशतीमुळे (Leopard Attack) गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर पुन्हा या बिबट्याने एका चिमुकलीचा जीव घेतला आहे. वडिलांसोबत शेतात गेलेल्या चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केल्याची घटना गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील इंदोरा निमगाव येथे घडली. बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बालिकेला गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान रात्री तिचा मृत्यू झालाय.

Continues below advertisement

Gondia Leopard Attack : वडीलांदेखत 9 वर्षीय रुचीला अक्षरशः फरफटत नेलं

मिळालेल्या माहितीनुसार, रुची देवानंद पारधी (वय 9), रा. इंदोरा निमगाव असे मृत बालिकेचे नाव आहे. रुची ही तिच्या वडिलांसोबत शेतावर गेली होती. वडील तारांचे कुंपण लावण्याचे काम करीत होते, तर रुची ही शेतातील बांधात उभी होती. दरम्यान, दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला करून तिला काही अंतरावर फरफटत नेले. रुचीचा रडण्याचा आवाज ऐकून तिचे वडील व आजूबाजूच्या शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यांनी आरडाओरड केली. यानंतर बिबट्याने रुचीला सोडून देत जंगलाच्या दिशेने पळ काढला. जखमी रुचीला तिचे वडील शेतकऱ्यांनी त्वरित स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान रात्री आठ वाजता तिचा मृत्यू झाला.

Continues below advertisement

Gondia News : जंगलात वृद्धाचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळला, वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा संशय

गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यातील दोडके जंगल परिसरात एका वृद्धाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळल्याची घटना उघडकीस आली. या वृद्धाचा मृत्यू हा हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. कन्सु हन्नु उईके (72) असे मृतदेह आढळलेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी मृताचा जावई फिर्यादी संजू सयाम (47) रा. बोळुंदा कोसमतोंडी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 28 नोव्हेंबर रोजी कन्सु उईके हे जांभळी येथील जंगलात सरपण आणण्यासाठी गेले होते. परंतु, सायंकाळ होऊनही ते घरी न परतल्याने घरच्यांनी त्यांचा शोध घेतला. परंतु, त्यांचा पत्ता लागला नाही. गावापासून एक किमी अंतरावर त्यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून या परिसरात वाघाचा वावर असल्याने व ही घटना घडल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती वन विभाग व पोलिसांना दिली. पोलिस व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. गोरेगाव पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

आणखी वाचा