मुंबई: दादर पोलीस स्टेशन कॉलनीत सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत एका 15 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. पोलीस कॉलनीतील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. मात्र आग विझल्यानंतर केलेल्या प्राथमिक तपासणीत मुलीने आत्महत्या केल्यानं आगीचा भडका उडाल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना व्यक्त केला आहे.
दादर पश्चिमेला असलेल्या पोलीस कॉलनीत दुपारी पावणे दोनच्या सुमारास ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत काही वेळातच ही आग नियंत्रणात आणली. या आगीत शेजारील तीन घरांचं नुकसान झालं आहे, तर श्रावणी चव्हाण या 15 वर्षीय मुलीचाही मृत्यू झाला आहे.
आग लागली त्यावेळी श्रावणी घरी एकटी होती. तिचे कुटुंबिय तिला घरी एकटे सोडून लग्न समारंभासाठी गेले होते. आग लागली त्यावेळी घराला बाहेरुन कुलूप लावलेलं होतं. तसेच आग लागल्यानंतर सिलिंडरचा स्फोट होण्यापूर्वी श्रावणीच्या घरातून रॉकेलचा वास येत होता अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे अनेक प्रश्न या घटनेनंतर निर्माण झाले आहेत.
अग्निशमन दलाच्या जवानांना घरात एक रिकामा केरोसिनचा कॅनही सापडला आहे. त्यामुळे हा नेमका आगीचा प्रकार आहे की आणखी काही, असा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.