Maharashtra Weather Update : राज्यभरात आज (6 सप्टेंबर 2025) आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. अशात, मुंबईत सकाळपासून पावसाची संततधार दिसते आहे. मुंबई, ठाणे, रायगडसाठी आज यलो अलर्ट देण्यात आला असून यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सध्या गिरगाव चौपाटी परिसरात चांगला पाऊस बरसतोय. राज्याची स्थिती पाहायची तर उत्तर महाराष्ट्रात आज जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. सोबतच, मुंबईत देखील आज दिवसभर पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आज वरुणराजानेही हजेरी लावली असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, पहाटेपासून अधून-मधून पडत असलेल्या मुसळधार पावसात गणेश भक्तांचा उत्साह अजिबात कमी झालेला नाही. या मुसळधार पावसात सुद्धा परळच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने गणेशभक्त सहभागी झाले आहेत. परळच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही मंडपातून आता पुढे गणेश गल्लीकडे मार्गस्थ होत आहे.
पालघर जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला
पालघर जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून आज पुन्हा पावसाला पहाटेपासून सुरुवात झाली आहे. सध्या जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पावसाची रिपरिप पहाटेपासूनच सुरू आहे. काही दिवस जोरदार पडणाऱ्या पावसाने गेल्या काही दिवसांपूर्वी थोडीशी विश्रांती घेतली होती. मात्र मागील दोन दिवसांपासून पुन्हा पावसाने ही सुरुवात केली आहे. भात शेतीसाठी हा पाऊस पूरक आहे. मात्र जर पुन्हा पावसाचा जोर वाढला तर भात शेतीला धोका सुद्धा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहादा तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार, गोमाई नदीने धोक्याचे पातळी ओलांडली
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे शहादा तालुक्यातील गोमाई नदीला पूर आलाय. गोमाई नदीची पाणी पातळीत मोठी वाढ झाली असल्यामुळे नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेच्या इशारा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आलेला आहे. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. तर आज यलो अलर्ट आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसापासून होत असलेल्या पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे अनेक नदी नाल्याना पूर आले असून गोमाई नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी नदीने धोक्याचे पातळी ओलांडली असल्यामुळे नदीला पूर असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोणीही नदीपात्रात मच्छिमार करण्यासाठी उतरू नये, असं आवाहन आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आलं आहे. तर येणारे काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याच्या वतीने वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा :