नागपूरः कृषी विद्यापीठांना कुठलीही गोष्ट सांगितली तर ते निधी नाही, अशी उत्तरे देतात. विविध वेतन आयोगांसाठी त्यांना केंद्र-राज्य सरकारकडून निधीची गरज पडते. दुसरीकडे तुमच्याकडे कृषी विभागाची हजारो एकर जमिन उपलब्ध आहे. त्यावर सिडबँक तयार करा, नर्सरी निर्माण करुन पैसे कमवून तुमचे खर्च भागवा, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कृषी विद्यापीठांना दिला. ते म्हणाले, विद्यापीठ जर कृषीच्या माध्यमातून पैसे उभारू शकत नाही तर शेतकरी कसा उभारणार, असा चिमटाही त्यांनी काढला.
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर भगत सिंह कोश्यारी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती. पुढे गडकरी म्हणाले, पारंपारीक पिकांद्वारे शेतकरी समृद्ध होऊ शकत नाही. आता शेतकऱ्याला अन्नदाता नव्हे तर उर्जादाता बनावे लागेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. कृषी विद्यापीठांना आपला 'माइंडसेट' बदलण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या गरजेच्या आधारावर संशोधन व्हावे. विदर्भातील शेतकऱ्यांना पिक घेताना येणाऱ्या समस्या, दर्जेदार रोपांची निर्मिती, कृषी उद्योगातून निर्यात वाढविणे आदींबाबत संशोधन करुन शेतकऱ्यांना समृद्ध करण्याची गरज असल्याचे यावेळी गडकरी म्हणाले.
विदर्भातून कापूस निर्यात करण्याचे माझे मानस असून येत्या काळात 17 देशात विदर्भाचा कापूस निर्यात करण्यात येईल. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविणे हे माझे ध्येर्य आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठ मोठी भूमिका पार पाडू शकते. यासाठी विचारसारणीमध्ये बदल करुन देशातील शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी कृषी विद्यापीठांनी कार्य करावे असे आवाहनही त्यांनी दिले.
आईने केला होता बँकेत नोकरीचा आग्रह
पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोकरी शोधणारे बनू नका, नोकरी देणारे बना. मलाही माझ्या आईने बँकेत नोकरी करण्यासाठी आग्रह केला होता. मात्र मी व्यवसाय निवडला आणि कृषी क्षेत्रातील माझ्या प्रकल्पातून 15 हजार तरुणांना नोकरी उपलब्ध करुन दिली असल्याचे गडकरी म्हणाले.