नागपूर : भारतीय सैन्य दलामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विदर्भातील दहा जिल्ह्यांमध्ये पुरुष उमेदवारांसाठी 5 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या नोंदणी नंतरच्या निवड प्रक्रियेसाठी सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी आर. विमला यांच्याशी चर्चा केली. जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.


दहा जिल्ह्यांतील तरुणांसाठी संधी


सैन्य दलाच्या अग्नीवीर भरती प्रक्रियानुसार विदर्भातील नागपूर, वर्धा, वाशिम, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ या दहा जिल्ह्यांमध्ये सैन्य दलातील काही पदांची भरती सुरू करण्यात आली आहे. दहावी व आठवी पास पात्रता असणाऱ्या या पदांसाठी ऑनलाइन नोंदणी पाच जुलै पासून तीन ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे. तरुणांनी या प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी जॉईनइंडियनआर्मी डॉट एनआयसी डॉट इन (joinindianarmy.nic.in) यावर नोंद करावी. स्वीकार्य उमेदवारांना त्यांच्या ईमेल आयडीवर प्रवेश पत्र 10 ते 20 ऑगस्ट दरम्यान मिळणार आहे.


भारतीय रॅलीचे आयोजन


त्यानंतर आवश्यक असणाऱ्या भरती प्रक्रिया संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चर्चा झाली. ईमेलवर प्रवेश पत्र पाठविल्यानंतर 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर पर्यंत भारतीय रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या संख्येने अग्नीवीर यावेळी निवड प्रक्रियेत सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याबाबतची प्राथमिक चर्चा आजच्या बैठकीमध्ये झाली. जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व सुविधा, भरती प्रक्रियेमध्ये पुरविल्या जातील असेही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


इतर महत्वाच्या बातम्या


UK New Prime Minister : भारतीय वंशाचे ऋषि सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान  


Maharashtra Elections 2022 : 92 नगरपरिषदेसाठी 18 ऑगस्टला मतदान, 19 ऑगस्ट रोजी मतमोजणी, पाहा येथे सध्या कुणाची सत्ता?


Amarnath Yatra : अमरनाथमध्ये मोठी दुर्घटना, ढगफुटीमुळे लंगर आणि तंबू गेले वाहून, 10 जणांचा मृत्यू