Amarnath Yatra : अमरनाथ येथे गुहेजवळ ढगफुटी झाली आहे. या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. एनडीआरफ आणि एसडीआरफच्या तुकड्या मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मृतांचा अकडा आणखी वाढण्याची शक्यता आेह. 


 काश्मीरच्या आयजीपींनी दिलेल्या माहितीनुसार, अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाली. अचानक आलेल्या पुराच्या तडाख्यात काही लंगर आणि तंबू वाहून गेले आहेत. या घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. पोलीस, एनडीआरएफ आणि एसएफकडून बचावकार्य सुरू आहे. जखमींना उपचारासाठी विमानाने रूग्णालयात हलवण्यात येत आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.


अमरनाथ गुहेच्या सखल भागात शुक्रवारी सांयकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ढगफुटी झाल्याची माहिती मिळाली. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि इतर यंत्रणांकडून बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती पहलगाम संयुक्त पोलीस नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे. 






अमरनाथ मध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली होती. यंदा  30 जूनपासून ही यात्रा सुरू झाली आहे. 43 दिवस चालणाऱ्या या यात्रेची 11 ऑगस्ट रोजी सांगता होणार आहे. 


या यात्रेत आतापर्यंत 65 हजारांहून अधिक भाविकांनी अमरनाथ गुहेतील बाबा बर्फानीचे दर्शन घेतले आहे. परंतु, खराब हवामानामुळे 2 ते 3 दिवस प्रवास थांबवावा लागला होता. 


दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. "अमरनाथ गुहेत ढगफुटीमुळे आलेल्या पूरस्थितीबाबत जम्मू आणि काश्मीरचे LG मनोज सिन्हा यांच्याशी बोललो आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, बीएसएफ आणि स्थानिक प्रशासन बचाव कार्य करत आहेत. लोकांचे प्राण वाचवणे हे आमचे प्राधान्य आहे, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.