हिंगोली/परभणी : एक जुलैपासून देशभरात लागू झालेल्या नवीन करप्रणालीमुळे व्यापारी आणि ग्राहकांमधून संमिश्र प्रतिक्रिया येत असताना, खतांची खरेदी करणारा शेतकरी मात्र खुश झाला आहे. त्याला कारण म्हणजे जीएसटीअंतर्गत 12 टक्क्यांवर असलेला स्लॅब खतांवर 5 टक्के भार लावला आहे. यामुळे खतांच्या जुन्या किमतीत 5 ते 70 रुपयांची घसरण झाली आहे. विशेष म्हणजे खत विक्री करणाऱ्या कंपन्यांनी त्यानुसार नवीन दरपत्रक जाहीर केले आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या जीएसटी या करप्रणालीमध्ये शेतीशी निगडीत बियाणे जीएसटीमुक्त करण्यात आले आहे. खतांवर पाच टक्के कर लावण्यात आला आहे. यापूर्वी हा कर 12 टक्क्यांवर होता. यामुळे कमी झालेल्या या कराने खतांच्या पोत्याचा भावही खाली आला आहे. त्यामुळे खतांच्या नव्या दरामुळे 5 ते  70 रुपयांची बचत होणार आहे. बाजारात खत विक्री करणाऱ्या कंपन्यांनीही एक जुलैपासून नवीन कारांनुसार दरपत्रक काढले आहे. त्यामुळे बाजारातही मोठ्या प्रमाणात खत खरेदी सुरु झाली आहे. खते                 जुने भाव                  नवीन भाव युरिया                 300                         294 डीएपी                1100                        1078 20.20.0.13     800                          784 सध्या पेरणी आणि मशागतीची दिवस असून शेतकरी शेतीमध्ये कामाला लागले आहेत. त्याचवेळी लागू झालेल्या नवीन करप्रणालीमुळे खताचे भाव खाली आले आहेत. यामुळे ऐन पेरणी आणि मशागतीच्या वेळी शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे. बाजारात खतांची मोठ्या प्रमाणात आवकही आहे. यामुळे हवी ती खते मिळत आहेत, तीही आधीपेक्षा कमी भावात. यामुळे होत असलेल्या पैशांच्या बचतीचा आनंद शेतकऱ्यांमध्ये दिसतो आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन करप्रणाली बद्दल अनेक मते आणि मतांतरे समोर येत आहेत. काही ठिकाणी नाराजीचा सूरही ऐकायला येतो आहे. पण शेती जगतात मात्र या कमी झालेल्या भावांमुळे शेतकरी आनंदी आहे हे नक्की.