Accident News अमरावती : अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर-अकोला मार्गावर भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. यात दोन वाहनात अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. आज दुपारी 3 वाजता दर्यापूर-अकोला मार्गावरील लासुर फाट्याजवळ दोन चारचाकी वाहनात जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की ज्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एका वाहनात चार जण होते तर दुसऱ्या वाहनात दोन जण होते. जखमींना अकोला येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पुढील कारवाई सुरू केली आहे. मात्र या अपघातामागील नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. सध्या पोलीस प्रकरणाचा तपास करत असून या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावर डंपरने दुचाकीस्वाराला चिरडलं
दुसरीकडे, रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर येथे देखील असाच एक अपघात झाल्याचे समोर आले आहे. यात एका डंपरने धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. महामार्गावरील काम करणा-या डंपरने दुचाकी स्वाराला धडक दिली आहे. बेजबाबदारपणे डंपर चालक गाडी चालवत असल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला असून मृत झालेल्या दुचाकी स्वाराचा मृतदेह ताब्यात घेण्यास ग्रामस्थांनी नकार दिला आहे. महामार्गावर सध्या चौपदरीकणाचं काम सुरु आहे. दरम्यान, संतप्त जमावाने मुंबई गोवा हायवे रोखून धरला. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूकीवर परिणाम झाल्याचेही दिसून आले आहे.
भरधाव ट्रकनं मोहाडीत दुचाकीस्वाराला चिरडलं
भंडारा येथील मोहाडीकडून तुमसरकडं जाणाऱ्या दुचाकीस्वारांना भरधाव ट्रकनं जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा घटनास्थळीस मृत्यू झाला. तर, दुसरा तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना मोहाडी - तुमसर मार्गावरील एमआयडीसी परिसरात घडली. अनिल गौतम असं मृतकाचं नाव असून अमोल पटले हा तरुण गंभीर जखमी आहे. दोघेही गोंदिया जिल्ह्यातील मुंडीकोटा येथील रहिवासी असून जखमी तरुणावर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. मोहाडी पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
हे ही वाचा