नाशिक : नाशिकच्या सटाणा तालुक्यात काल झालेल्या गारपीटीनंतर आज शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यास महसूल विभागाचे अधिकारी वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
संतप्त शेतकऱ्यांनी नामपूर रस्त्यावर दोन तास रास्तारोको केला. तसंच आमदार दिपीका चव्हाण आणि तहसिलदारांना घेरावही घालण्यात आला. अखेर दिपीका चव्हाण यांनी नुकसान भरपाईचं आश्वासन दिल्यानंतर रास्तारोको मागे घेतला गेला.
सटाणा तालुक्यातील अनेक गावात काल अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसंच काही भागात गारपीटही झाली. काल दुपारी अंबासन आणि आसखेडा या गावात गारपीट झाली. त्यामुळे अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने डाळिंब, कांदा पिकांचंही नुकसान झालं.
सटाणा तालुक्यातील नामपूर परिसराला रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास गारपीट, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपलं. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. वादळी वारा आणि गारपीटीमुळे परिसरातील कांदा, गहू, डाळींब, कांदा बियाणांचं मोठं नुकसान झालं आहे.