Nashik News नाशिक : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या हस्ते नाशिकमध्ये रेल्वेच्या व्हील शॉपचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमानंतर त्यांच्या समोरच शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपच्या (BJP) इच्छुक उमेदवारांमध्ये टोलेबाजी झाल्याचे दिसून आले. या प्रसंगाच्या आधीच रावसाहेब दानवे यांनी नाशिकच्या जागेबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली होती. 


आगमी लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. सध्या महायुती तसेच महाविकास आघाडीत जागा वाटपावरून वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहे. मात्र स्थानिक पातळीवर अनेक इच्छुकांकडून दावेदारी सुरु आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघावर याआधी स्थानिक पातळीवर जवळजवळ सर्वच पक्षांकडून दावेदारी करण्यात आली आहे. काल सोमवारी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनीही नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचाच आहे, असा दावा केला होता. आज शिवसेना आणि भाजपच्या इच्छुक उमेदवारांमध्ये तू तू मै मै झाल्याचे दिसून आले. 


नेमकं काय घडलं?


शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) रावसाहेब दानवे यांना भेटण्यासाठी आले होते. दानवे यांनी  माध्यमांशी संवाद साधल्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी दानवेंचे स्वागत केले. त्यानंतर फोटो काढताना भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटील (Dinkar Patil) यांनी माझ्या वाटेत येऊ नका, असा खोचक टोला विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना लगावला आणि आपल्या समोरून बाजूला काढले. 


दोघांतील वाद मिटविण्यासाठी मलाच यावे लागेल - रावसाहेब दानवे


यानंतर दानवे यांनीही टोलेबाजीची संधी सोडली नाही. दोघांतील वाद मिटविण्यासाठी मलाच यावे लागेल, असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला. त्यामुळे एकच हशा पिकल्याचे दिसून आले. दरम्यान, शिंदे गटाकडून विद्यमान खासदार हेमत गोडसे हे नाशिक लोकसभा मतदार संघातून हॅटट्रिक करण्याच्या तयारीत आहेत. तर भाजपकडून माजी सभागृह नेते दिनकर पाटील हे इच्छुक आहेत. मात्र नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीतून कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.


रावसाहेब दानवेंची मोठी घोषणा


दरम्यान, रावसाहेब दानवे यांच्या हस्ते रेल्वेच्या व्हील शॉपचे उद्घाटन पार पडले. यावेळी रावसाहेब दानवे म्हणाले की, नाशिकमध्ये व्हील शॉपचे आज उद्घाटन झाले. या व्हील शॉपमुळे रोजगारदेखील उपलब्ध होईल. या वर्कशॉपमुळे फक्त नाशिकचा फायदे होणार नाही तर इतर भागाचा देखील फायदा होईल. 1862 साली पहिली रेल्वे नाशिकला आली. रेल्वेच्या दृष्टीने नाशिक विभाग महत्वाचा आहे. 150 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलीय, त्या माध्यमातून कोच फॅक्टरी नाशिकमध्ये तयार करण्यात येणार आहे. यातून नवीन इंजिन बोगी, आणि जुन्या बोगीचे मेंटेनन्स केले जाणार आहे, अशी मोठी घोषणा त्यांनी केली आहे. 


आणखी वाचा 


'सध्या दोन नाटकांची जुळवाजुळवी करण्याचं काम सुरु'; जरांगेंच्या आंदोलनावर छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य