धुळे : धुळे (Dhule) जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवी (Sangvi) इथे गुरुवारी (10 ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास बॅनर (Banner) फाडण्यावरुन दोन गटात वाद निर्माण झाला. दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक (Stone Pelting) करण्यात आली. या दगडफेकीत 15 पोलीस कर्मचारी आणि तीन ते चार स्थानिक नागिरक किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी 150 ते 200 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यातील 65 जणांची ओळख पटली असून 13 जणांना अटक करण्यात आली आहे, तर इतरांचा शोध सुरु आहे, सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी केले आहे. दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज पोलिसांनी सांगवी गावात रुट मार्च काढला.
बॅनर फाडण्यावरुन दोन गटात वाद
सांगवीत काल दोन गटात वाद निर्माण झाला होता. आदिवासी दिनाचा बॅनर फाडल्याने तणाव निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जाब विचारण्यासाठी एक गट गेला, त्यांना मारहाण झाली. त्यानंतर सांगवी, सारणपाडा या दोन गावांमध्ये दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत दगडफेक झाली, ज्यात गाड्यांचं मोठं नुकसान झालं. तर 15 पोलीस कर्मचारी आणि तीन ते चार स्थानिक जखमी झाले. या दगडफेकीतील जखमी 15 पोलीस कर्मचाऱ्यांवर प्रथमोपचार करण्यात आले आहेत. तर स्थानिक नागरिकांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस तपास करत आहेत. दगडफेक करणाऱ्यांना अटक करण्याचं सत्र सुरु झालं आहे.
गावात पोलिसांचा रुट मार्च
दरम्यान गावात तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे. गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावात शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी रुट मार्च काढला आहे. गावातील सर्व व्यवहार बंद आहे. दुकानं बंद असून संचारबंदीसारखी परिस्थिती पाहायला मिळत आहे. नागरिकांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी पोलिसांकडून रुट मार्च काढण्यात आला आहे.
समाजकंटकांमध्ये भीती निर्माण होण्याच्या उद्देशाने रुट मार्च : पोलीस
काल झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर गावात तणावपूर्व वातावरण आहे. नागरिकांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण व्हावं तसंच समाजकंटकांमध्ये भीती निर्माण व्हावी यासाठी या उद्देशाने हा रुट मार्च काढतोय. यामध्ये स्थानिक जिल्हा पोलिसांसोबतच दंगल नियंत्रण पथक आणि एसआरपीएफची कंपनी या रुट मार्चमध्ये सहभागी आहे. परिस्थिती जरी तणावपूर्ण असली तरी पोलिसांच्या 100 टक्के नियंत्रणात आहे. संपूर्ण गावात रुट मार्च काढत आहोत. नव्या सांगवीतून रुट मार्च काढत जुन्या सांगवीत आलो आहे, जिथे काल प्रत्यक्षात कालची घटना घडली तिथे आलो आहोत. जिल्हा पोलीस दल आणि एसआरपीएफचा संयुक्त बंदोबस्त गावात तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.