धुळे : पार्थ पवारांच्या जमीन घोटाळा प्रकरणात (Parth Pawar Land Scam) अजित पवारांनी तातडीने राजीनामा द्यावा, अन्यथा अमित शाहांकडे त्यांची तक्रार करणार असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी म्हटलं. दमानियांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ता सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी प्रतिक्रिया दिली. रिचार्जवाल्या ताई पुन्हा एकदा अॅक्टिव्ह झाल्या आहेत. अजितदादांचा (Ajit Pawar) राजीनामा मागण्यासाठी अंजली दमानिया या डोनाल्ड ट्रम्प यांनाही जाऊन भेटतील असा टोला सूरज चव्हाण यांनी लगावला.
येत्या 24 तासात अजित पवारांनी राजीनामा द्यावा, दिल्लीत अमित शाहांची भेट घेणार असल्याचं दमानियांनी म्हंटल. तसेच अमित शाहांनी वेळ न दिल्यास त्यांच्या ऑफिसबाहेर जाऊन बसणार असल्याचा इशाराही दमानिया यांनी दिला आहे.
Suraj Chavan On Anjali Damania : रिचार्जवाल्या ताई अॅक्टिव्ह
दमानिया यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण म्हणाले की, "निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक अजितदादांवर आरोप करण्यासाठी त्यांना अॅक्टिव्ह करण्यात आले आहे. अजित दादांच्या राजीनामासाठी अंजली दमानिया या डोनाल्ड ट्रम्पला देखील जाऊन भेटतील. त्यांच्याकडे इतका मोठा रिचार्ज झाला आहे की त्यांनी अमित शाहांची भेट जर झाली नाही तर त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घ्यावी आणि त्यांच्याकडे अमित भाईंचा देखील राजीनामा मागावा."
हे सुपारी बाज व्यक्तिमत्व परदेशातून येऊन अजित दादांवर आणि पवार कुटुंबावर आरोप करते. अंजली दमानियांच्या मागे बोलवता धनी वेगळाच आहे. त्यांना रिचार्ज करून सुपारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात अनेक घटना घडतात, मात्र अजितदादांना बदनाम करण्यासाठी दमानिया कारस्थान करतात. त्यांचा जोपर्यंत रिचार्ज आहे तोपर्यंत त्या राष्ट्रवादीवर टीका करणार असं सूरज चव्हाण म्हणाले.
आमचं दमानियांना खुलं आव्हान आहे, त्यांनी जे आरोप केले आहे ते सिद्ध करावेत. रिचार्जवाल्या ताईचे घोटाळेदेखील आमच्याकडे आहेत. त्यांचे घोटाळेदेखील मी येणाऱ्या काळाच्या जनतेसमोर उघडकीस आणणार असल्याचा दावा सूरज चव्हाण यांनी केला.
Anjali Damania Vs Ajit Pawar : अजितदादांवर दमानियांचा आरोप
पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील जमीन प्रकरणी पार्थ पवार अडचणीत सापडल्यानंतर अजित पवारांमागचं शुक्लकाष्ठ कमी होताना दिसत नाही. या प्रकरणात अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा आणि पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा तातडीनं राजीनामा देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केली. फडणवीसांनी तातडीनं अजित पवारांचा राजीनामा न घेतल्यास त्यांची तक्रार केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडे करावी लागेल असा इशाराही दमानियांनी दिला. तसंच जुनी चौकशी समिती बरखास्त करुन नवीन समिती स्थापन करण्याचीही त्यांनी मागणी केली.
कोरेगाव पार्कमधील 1800 कोटींची 40 एकर जमीन पार्थ पवारांनी केवळ 300 कोटीत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसंच जमीन खरेदीवेळी सरकारी महसूल बुडवत केवळ 500 रुपयांच्या स्टँम्प ड्युटी भरत हा व्यवहार केल्याचा आरोप आहे.
Parth Pawar Land Deal : अमेडिया कंपनीच्या प्रत्येक गोष्टीत फ्रॉड
अमेडिया कंपनीबाबत अंजली दमानियांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. अमेडिया कंपनीने डेटा सेंटरसाठी एलओआय मागितला होता, डेटा सेंटरसाठी 98 लाखांची गुंतवणूक अमेडियाने दाखवली असल्याचं दमानियांनी म्हटलंय. अमेडिया कंपनीच्या प्रत्येक गोष्टीत फ्रॉड असल्याचा दावाही दमानियांनी केला. डेटा सेंटरसाठी एलओआय दाखवून स्टँप ड्युटीत सूट घेतली. जमिनीसाठी हा व्यवहारच नव्हता, केवळ डेटा सेंटरसाठी सूट मागितली असल्याची माहिती दमानियांनी दिलीय..
ही बातमी वाचा: