Monkey Pox: जगभरात थैमान घालणाऱ्या मंकी पॉक्सचा (Monkey Pox) राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यात (Dhule) आढळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. रुग्णाचे दोन्ही रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने हिरे रुग्णालय प्रशासनही सतर्क झाले आहे. मंकी पॉक्स हा संसर्गजन्य आजार असल्याने रुग्णाला स्वतंत्र विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी महापालिकेला कळविण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबत सुचित करण्यात आले आहे.
मंकी पॉक्स बाधित रुग्ण 2 ऑक्टोबर रोजी तो सौदी अरेबियाहून धुळ्यातील गरीब नवाज नगर येथे आला होता. गेल्या चार वर्षांपासून तो सौदी अरेबियात वास्तव्यास आहे. त्याच्या मुलीचे लग्न असल्याने तो धुळ्यात आला होता. मात्र, येथे आल्यानंतर त्याला त्वचेचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे तो दि. ३ ऑक्टोबर रोजी हिरे रुग्णालयात तपासणीसाठी गेला.
Monkey Pox: दोन्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह
या रुग्णाने हिरे रुग्णालयातील डॉक्टरांना आपला त्रास सांगितला. डॉक्टरांना मंकी पॉक्सची लक्षणे दिसून आल्याने मनपाच्या पथकाने सदर रुग्णाच्या रक्ताचे नमूने घेतले होते. सदर सॅम्पल पुण्यातील एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या रुग्णाचा मंक्सी पॉक्सचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. डॉक्टरांनी शंकेचे निरसन करण्यासाठी पुन्हा रक्ताचे नमूने तपासणीसाठी पाठविले होते.
Monkey Pox in Maharashtra: महाराष्ट्रात पहिलाच रुग्ण
धुळ्यात आढळलेला मंकी पॉक्सचा रुग्ण हा महाराष्ट्रातील पहिलाच रुग्ण असल्याचे पुण्यातील एनआयव्हीने स्पष्ट केले आहे. मंकी पॉक्समध्ये दोन प्रकारचे व्हेरीयंट आहेत. त्यात क्लायड -1 हा दुर्मिळ व अधिक संसर्गजन्य असतो. भारतात आतापर्यंत याचे 35 रुग्ण आढळले आहेत. तर महाराष्ट्रातील ही पहिलीच केस आहे. सदर रुग्णाला डायबेटीज असल्याने बरा होण्यासाठी वेळ लागत आहे. मंकी पॉक्स आजार पसरु नये म्हणून महापालिका व जिल्हाधिकारी यांना कळविले असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या