Vidhan Parishad Election 2024 : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. महायुतीकडून (Mahayuti) 9 उमेदवार रिंगणात असून महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) तीन जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीत एमआयएम (MIM) पक्ष महायुती की महाविकास आघाडीच्या बाजूने असणार याबाबत धुळ्याचे आमदार फारूक शाह (Faruk Shah) यांनी महत्वाचे भाष्य केले आहे.  


महाविकास आघाडीकडून काँग्रेसने प्रज्ञा सातव, शिवसेना ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर तर शेकापचे जयंत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीकडून भाजपच्या पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत या पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना शिंदे गटाने माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमेदवारी दिली आहे. तर अजित पवार गटाने राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीसाठी 12 जुलैला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 


विधान परिषद निवडणुकीत एमआयएमचा कुणाला पाठींबा? 


विधान परिषद निवडणुकीबाबत धुळ्याचे आमदार फारूक शाह  यांनी विधान परिषद निवडणुकीबाबत म्हटले आहे की, या निवडणुकीत एमआयएम पक्ष कुणाच्या बाजूने उभा राहील, याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी ओवैसी घेतील, त्यानंतर आम्ही आमची भूमिका जाहीर करू. आम्हाला महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करण्यास सांगितल्यास आम्ही त्यांच्या बाजूने मतदान करून किंवा तटस्थ राहण्यास सांगितल्यास तशी भूमिका घेऊ, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 


महाराष्ट्रात एमआयएमचे दोन आमदार


महाराष्ट्रात 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाचे दोन आमदार निवडून आले होते. मालेगाव मध्य आणि धुळे शहराची जागा जिंकत एमआयएमने उत्तर महाराष्ट्रात प्रवेश केला होता. धुळे शहर मतदारसंघातून फारूक शाह तर मालेगाव मध्य मतदारसंघातून मुफ्ती मोहम्मद इस्माईल निवडणून आले. आता विधान परिषद निवडणुकीत एमआयएमचे हे दोन आमदार कुणाच्या बाजूने मतदान करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


कुणाकडे किती संख्याबळ ?


महायुती


भाजप -103


शिंदे सेना – 37


राष्ट्रवादी (AP) - 39


छोटे पक्ष - 9


अपक्ष - 13


एकूण - 201 


मविआ


काँग्रेस - 37


ठाकरे गट - 15


राष्ट्रवादी (SP) - 13


शेकाप - 1


अपक्ष - 1


एकूण - 67 


एमआयएम - 2, सपा - 2, माकप - 1 क्रां. शे. प. - 1 एकूण - 6 आमदार तटस्थ आहेत.


विधानसभेचं एकूण 274 एवढं संख्याबळ आहे.


आणखी वाचा 


MLC Election 2024: विधानपरिषद निवडणुकीतून कोणाचीही माघार नाही, 11 जागांसाठी 12 जण लढणार, गुप्त मतदान कोणाचा घात करणार?