Balasaheb Thorat : राज्यात लोकसभा (Loksabha) आणि विधानसभेच्या (vidhansabha) निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) घवघवीत यश मिळेल असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी  व्यक्त केला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला 38 जागा तर विधानसभेच्या निवडणुकीत 180 जागा मिळतील असे थोरात म्हणाले. ते धुळ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांकडं पाठ फिरवली


धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आज मतदारांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. राज्यात एकीकडे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान होत  आहे. अशातच दुसरीकडं मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अयोध्येचा दौरा करत आहेत. जेव्हा कुटुंबातील सर्व परिस्थिती चांगली असते तेव्हा देवदर्शनाला जावे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.


कुणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न 


ईव्हीएम मशीनवर माझा विश्वास असल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं होतं.  अजित पवारांच्या या वक्तव्याची राज्यभर चर्चा झाली होती. याबाबतही बाळासाहेब थोरात यांना विचारण्यात आलं, त्यावेळी थोरात म्हणाले की,  जेव्हा निवडणुकीचा निकाल समोर येतो तेव्हा ईव्हीएम मशीनबाबत संशय निर्माण होतो. कुणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे सांगत बाळासाहेब थोरात यांनी अजित पवारांच्या वक्तव्याकडं दुर्लक्ष केले.


कसब्याच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील विधानसभेला महाविकास आघाडी  200 पेक्षा जास्त जिंकेल असा विश्वास व्यक्त केला होता. 2024 निवडणुकीत महाविकास आघाडीने एकजुटीने काम केलं तर विधानसभेला महाविकास आघाडीच्या 200 पेक्षा जास्त जागा मिळतील. तर लोकसभेच्या किमाना 40 तरी जागा आम्ही जिंकू असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आता बाळासाहेब थोरातांनी देखील 180 पेक्षा जास्त जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Ajit Pawar : महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा, विधानसभा एकत्रित लढणार; अजित पवारांचा वज्रमुठ सभेतून निर्धार