धुळे : गेल्या काही महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईचा धडाका लावला असून अनेक सरकारी अधिकारी व कर्मचारी जाळ्यात अडकले आहेत. धुळे (Dhule) येथील पंचायत समिती कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या रोहिणी नांद्रे यांना तब्बल 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे जिल्हा परिषद आणि शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.  

Continues below advertisement

धुळे तालुक्यातील चांदे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी नांद्रे यांनी भेट देऊन पाहणी केली असता या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या त्यांना कमी आढळून आली होती. याबाबत वरिष्ठांना शाळेचा प्रतिकूल अहवाल सादर न करण्याच्या मोबदल्यात तसेच शाळेला समग्र शिक्षा योजनेअंतर्गत मिळालेल्या अनुदानाच्या मोबदल्यात शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी नांद्रे यांनी स्वतः करिता आणि शिक्षण अधिकारी कुवर यांच्या करिता दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत, तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी नांद्रे यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. तर, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातही एका महिला अधिकाऱ्याने अशाप्रकारे लाचेची मागणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडविण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्यामध्ये, विद्यार्थ्यांना सोयी-सुविधांसह दर्जेदार शिक्षण देण्याचाही शासनाची प्रयत्न आहे. त्यासाठी, मोठ्या प्रमाणात निधी देखील जिल्हा परिषदांसह, शासकीय शाळांवर खर्च केला जातो. मात्र, शिक्षण क्षेत्राचे रक्षक म्हणून ज्यांना जबाबदारी देण्यात आलीय. त्यांच्याकडूनच शाळांवर आघात होत असल्याचं या लाचप्रकरणावरुन दिसून येत आहे. 

Continues below advertisement

हेही वाचा

आपल्या कार्यकर्तृत्त्वाची महती मंत्रालयात जोरदार रंगलीय बरं का; अमोल मिटकरींचा विखे पाटलांवर पलटवार