Dhule Cash Scandal : धुळे शहरातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहाच्या खोली क्रमांक 102 मध्ये सापडलेल्या एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांच्या रोकड प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून आता तपासाला गती देण्यात आली आहे. काल सायंकाळी (दि. 23) आमदार अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांचे स्वीय सहाय्यक असलेले किशोर पाटील यांची पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली असून आज त्यांचा जबाब घेतला जाणार आहे.
तसेच खोली क्रमांक 102 मध्ये आणखीन दोन व्यक्ती राहत असल्याचे पोलिसांच्या तपासून समोर आले असून पोलिसांकडून त्या अनुषंगाने तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र हे दोघेजण कोण होते? याची माहिती अद्याप पोलिसांना मिळालेली नाही. शासकीय गुलमोहर विश्रामगृहातील सीसीटीव्ही फुटेज काल पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले असून या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाणार आहे.
किशोर पाटलांच्या भ्रमणध्वनीचा सीडीआर मागवला
तसेच याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आठ ते 10 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे देखील जबाब काल सायंकाळी उशिरा नोंदविण्यात आले आहेत. तर या प्रकरणातील मुख्य संशयित असलेले किशोर पाटील यांच्या भ्रमणध्वनीचा सीडीआर पोलीस यंत्रणेने सायबर शाखेकडून देखील मागविला आहे. हा सीडीआर प्राप्त झाल्यानंतर किशोर पाटील यांनी नेमके कोणाकोणाशी संभाषण केले? त्यांच्याशी कोणी संपर्क साधला? याबाबतचा तपशील देखील मिळणार आहे. आता या प्रकरणात नेमकं पुढे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
एसआयटीवर माझा विश्वास नाही : अनिल गोटे
दरम्यान, धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या विधीमंडळाच्या अंदाज समितीमधील आमदारांना पाच कोटींचे वाटप करण्यासाठी पैसे आणल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी केला होता. यानंतर धुळे विश्रामगृहाच्या खोली क्रमांक 102 मध्ये एक कोटी 84 लाख रुपये खोलीत ठेवल्याचे पोलिसांना आढळले होते. ज्या खोलीत पैसे आढळले ती खोली आमदार अर्जून खोतकर (Arjun Khotkar) यांचे स्वीय सहायक किशोर पाटील यांच्या नावावर बूक होती. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गंभीर दखल घेतली असून चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तर मुख्यमंत्र्यांनी एसआयटी नेमण्याचे आदेश दिल्यानंतर माजी आमदार अनिल गोटे यांनी माझा चौकशी समितीवर विश्वास नसल्याचे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. एसआयटी म्हणजे यांना सोयीस्कर होणारी कमिटी आहे. यापूर्वी देखील मंत्री जयकुमार रावल यांच्या रावल बँक संदर्भात एसआयटी स्थापन करण्यात आली, अब्दुल करीम तेलगी प्रकरणात एसआयटी नेमण्यात आली. मग तपास सीबीआयकडे का देण्यात आला? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. एसआयटी, अँटी करप्शन, धुळे पोलीस यांच्यावर माझा अजिबात विश्वास नाही, अशी प्रतिक्रियाही अनिल गोटे यांनी दिली आहे.
आणखी वाचा