धुळे: पोलिसात जमा केलेली अॅक्टिव्हा स्कूटर मूळ मालकाला परत देण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच घेताना धुळ्यातील पोलीस हवालदार आणि त्याच्या पंटरला अँटिकरप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.
तक्रारदार हा धुळे येथील रहिवासी असून त्यांच्या भावाचे लग्न असल्याने त्याने लग्नपत्रिका वाटण्यासाठी सुमारे एक महिन्यापूर्वी त्याच्या मित्राकडून अॅक्टिव्हा दुचाकी वाहन खरेदी केली होती. दुचाकी वाहन त्यांनी घरासमोर उभे करून ठेवले असता त्यांच्या ओळखीच्या दोन मुलांनी दहा मिनिटाकरता कामासाठी वाहन घेऊन जातो असे सांगून तक्रारदाराच्या भावाकडून अॅक्टिव्हा नेली. त्यानंतर सदर मुलांना दुचाकीसह सोनगीर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संजय जाधव यांनी सोनगीर पोलीस स्टेशन हद्दीत त्यांना रस्त्यावर अडवले. त्यांच्याजवळ दारूच्या बाटल्यांचे बूच मिळून आल्याने त्यांनी दुचाकी वाहन सोनगीर पोलीस स्टेशन येथे जमा करून घेऊन त्या मुलांना सोडून दिले होते.
यानंतर तक्रारदार यांनी वेळोवेळी सोनगीर पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलीस नाईक संजय जाधव यांची भेट घेतली असता त्यांनी त्यांचे पोलीस स्टेशन येथे जमा असलेले अॅक्टिव्हा दुचाकी वाहन सोडविण्यासाठी 75 हजार रुपये लाचेची मागणी केली. पैसे दिले नाही तर तक्रारदार यांच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल होईल असे सांगितले. सदर तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात पोलीस नाईक संजय जाधव यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारदाराच्या तडजोडी अंती पोलीस नाईक संजय जाधव यांनी 20 हजार घेण्याचे मान्य केल्यानंतर याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रारदाराने माहिती दिली.
सदर तक्रारीची दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस नाईक संजय जाधव याने त्याचा पंटर ज्ञानेश्वर कोळी (रा. देवभाने तालुका जिल्हा धुळे) याच्या हस्ते देवभाने येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत समोरील रस्त्यालगत वीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस नाईक संजय जाधव आणि त्याचा पंटर ज्ञानेश्वर कोळी याला ताब्यात घेतले आहे.