Anil Gote on Arjun Khotkar : धुळे (Dhule) शहरातील शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मधून तब्बल 1 कोटी 84 लाख 84 हजार 200 रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली असून, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण केली आहे. जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांचे खाजगी स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांनी संबंधित खोली १५ मे पासून गुलमोहर रेस्ट हाऊसमध्ये बुक केली होती. अनिल गोटे यांना या खोलीमध्ये तब्बल पाच कोटी रुपये असण्याचा संशय होता. त्यांनी रविवारी रात्री आपल्या कार्यकर्त्यांसह या खोलीबाहेर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर प्रशासनाने संबंधित खोली उघडली असता, त्यामध्ये १ कोटी ८४ लाख ८४ हजार २०० रुपयांची रोकड आढळून आली आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आमदार अर्जुन खोतकर यांनी अनिल गोटे यांचे सर्व आरोपांना फेटाळून लावत, "हे त्यांची जुनी सवय आहे," असे म्हटले. दरम्यान, अनिल गोटे यांनीही आता अर्जुन खोतकर यांना थेट आव्हान दिले आहे. 

Continues below advertisement

खोतकर आपल्याला कधीपासून ओळखतात? गोटेंचा सवाल 

अर्जुन खोतकर यांनी अनिल गोटे यांची ही जुनी सवय असल्याचा आरोप केल्यानंतर त्यावर अनिल गोटे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अर्जुन खोतकर हे आपल्याला कधीपासून ओळखतात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. दर सहा महिन्यांनी पक्ष बदलून बेडूक उड्या मारणाऱ्या व्यक्तीवर किती विश्वास ठेवायचा? असेही अनिल गोटे यांनी म्हटले आहे. त्या ठिकाणी सापडलेले एक कोटी 84 लाख 84 हजार नेमके कोणाचे आहेत? तुमचा पीए 15 मे 2025 पासून त्या ठिकाणी का आलेला होता?  अनिल गोटे खोटा आरोप करत असतील तर सरकार तुमचं आहे, मला अटक करा, असे आव्हान त्यांनी अर्जुन खोतकर यांना दिले आहे. 

नेमकं काय म्हणाले होते अर्जुन खोतकर? 

अर्जुन खोतकर म्हणाले होते की, आरोप करायला काय? आरोप कोणी काहीही करू शकतं, खरंतर आमच्या समितीचा याविषयी कुठलाच काहीही संबंध नाही. सर्व आरोप आम्ही फेटाळतो. या समितीला आणि सरकारला बदनाम करण्यासाठी हे प्लांट केलेले आहे का? असा संशय आम्हाला येत आहे. अनिल गोटेंच्या आरोपात कुठेही तथ्य नाही. त्यांची ही जुनी सवय आहे, अशा पद्धतीने आरोप करायचे आणि समितीला बदनाम करायचं. शासनाला बदनाम करायचं. त्यामुळे या आरोपात कुठलेही तथ्य नाही आणि आम्ही हे सर्व आरोप फेटाळतो, असे त्यांनी म्हटले आहे.  

Continues below advertisement

अंदाज समिती नंदुरबारच्या दिशेने रवाना

दरम्यान,  धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या अंदाज समितीची उद्या सकाळी नऊ ते अकरा वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात बैठक होणार आहे. तर समिती आज नंदुरबारच्या दिशेने रवाना होणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. मात्र, नंदुरबार येथील बैठक पूर्व नियोजित नसताना देखील समिती नंदुरबारच्या दिशेने रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.  

आणखी वाचा 

Dhule News : धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात सापडलं कोट्यवधींचं घबाड, अनिल गोटेंचा 'तो' आरोप खरा ठरला; पोलिसांनी 102 क्रमांकाची खोली उघडली अन्...